हा अर्थसंकल्प होता की OLX, सरकार सर्वकाही विकण्याच्या तयारीत; CPM नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 02:59 PM2021-02-01T14:59:33+5:302021-02-01T15:02:11+5:30

दृष्टीहीन अर्थसंकल्प असल्याची टीएमसी नेते डेरेक ओ ब्रायन यांची टीका

union budeget 2021 political reaction opposition leaders finance minister sitharaman left cpm salim ali tmc also criticize | हा अर्थसंकल्प होता की OLX, सरकार सर्वकाही विकण्याच्या तयारीत; CPM नेत्याची टीका

फोटो सौजन्य - पीटीआय

googlenewsNext
ठळक मुद्देदृष्टीहीन अर्थसंकल्प असल्याची टीएमसी नेते डेरेक ओ ब्रायन यांची टीकाटॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यानंतर अनेक स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर दुसरीकडे काही विरोधकांनी मात्र यावर टीका केली आहे. केंद्राच्या या अर्थसंकल्पावर सीपीएमनं हल्लाबोल केला. या अर्थसंकल्पात रेल्वे, बँक, विमा, संरक्षण आणि स्टील या सर्वांची विक्री करण्याच्या तयारीत सरकार आहे. हा अर्थसंकल्प आहे की OLX असा सवाल सीपीएमचे नेते सलीम अली यांनी केला. तसंच त्यांनी या अर्थसंकल्पावर टीकाही केली. तर दुसरीकडे हा भांडवलदारांचा अर्थसंकल्प असल्याचं म्हणत सीताराम येचुरी यांनी त्यावर टीका केली. 

अर्थसंकल्पावर टीएमसी नेते डेरेक ओ ब्रायन यांनीदेखील टीका केली. "हा भारताचा पहिला पेपरलेस १०० टक्के दृष्टीहीन अर्थसंकल्प आहे. यांची थीम देश विका ही आहे. रेल्वे विकली जात आहे, विमानतळं विकण्याची तयारी आहे, बंदरे विकली जात आहेत, विमा क्षेत्र विकलं जात आहे, २३ पीएसयू विकल्या जात आहेत. सरकारनं सामान्य लोकांकडे दुर्लक्ष केलं, शेतकऱ्यांकडेगी दुर्लक्ष केलं. श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत आहेत आणि मध्यम वर्गीयांसाठी काहीच नाही, गरीब अजून गरीब होत आहेत," अशी टीका तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी केली. 

योगी आदित्यनाथांकडून प्रशंसा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अर्थसंकल्पाची प्रशंसा केली. तसंच हा कल्याणकारी अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं. हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीनं योग्य आहे. यात शेतकरी, मध्यम वर्ग आणि गरीबांसहित सर्वांचा विचार केला असल्याचंही योगी आदित्यनाथ म्हणाले. 

फडणवीसांकडून अर्थमंत्र्यांचे आभार

अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील नाशिक आणि नागपूरच्या मेट्रो प्रकल्पांची घोषणा करण्यात आल्यानंतर भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून नागपूर आणि नाशिककरांचे अभिनंदन केले आहे. तसंच, केंद्र सरकारनं नाशिक मेट्रोचं मॉडेल स्वीकारलं ही आनंदाची बाब आहे. नाशिक मॉडेल देशातील इतर शहरांमध्ये स्वीकारलं जाईल. हे विकासाचे आणि नवनिर्माणाच्या धोरणाचे यश आहे. नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी आणि नागपूर मेट्रो दुसऱ्या टप्प्यासाठी ५९७६ कोटी रुपये आत्मनिर्भर भारत अतंर्गत देण्यात आल्याची माहित देत देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.

टॅक्स स्लॅब जैसे थे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात 'इन्कम टॅक्स स्लॅब'मध्ये काही बदल केला जातो का? याकडे नोकरदार वर्गाचं लक्ष लागून होतं. पण सरकारनं नोकरदार वर्गाची निराशा केली आहे. इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल सरकारकडून करण्यात आलेला नाही. त्यामुळे करदात्यांना गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षातही आयकर भरावा लागणार आहे. 
 

Web Title: union budeget 2021 political reaction opposition leaders finance minister sitharaman left cpm salim ali tmc also criticize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.