Union Budget 2019: उपनगरीय रेल्वे ‘अपग्रेड’ होणार; १,६०० कोटींची तरतूद, मुंबई ‘लोकल’साठी निश्चित रकमेचा उल्लेख नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 05:30 AM2019-07-06T05:30:59+5:302019-07-06T05:35:02+5:30
देशात उपनगरीय रेल्वेचे जाळे २०१९-२० या वर्षात ६३.२२ किलोमीटरने वाढविले जाणार आहे.
नवी दिल्ली : मुंबईसह देशातील उपनगरीय रेल्वेच्या विकासासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात १,६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु यात मुंबई उपनगरीय रेल्वेच्या विकासासाठी निश्चित रकमेचा उल्लेख केलेला नाही.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प मांडताना मुंबईसह देशातील महानगरांमधील उपनगरीय रेल्वेचा विकास करण्याचे सूतोवाच केले. परंतु प्रत्येक महानगरासाठी किती तरतूद केली आहे, याचा उलगडा केलेला नाही. मुंबईसह दिल्ली व कोलकाता येथेही उपनगरीय रेल्वे आहे.
देशात उपनगरीय रेल्वेचे जाळे २०१९-२० या वर्षात ६३.२२ किलोमीटरने वाढविले जाणार आहे. यासाठी १६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे दीड लाखावर प्रवाशांना उपनगरीय रेल्वेची सुविधा मिळेल, असा दावा केला आहे.
गेल्या वर्षापासून रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला जात नसल्याने निर्मला सीतारामन यांनी रेल्वेच्या तरतुदीचा भाषणात थोडक्यात उल्लेख केला. अर्थसंकल्पात नव्याने या आर्थिक वर्षात ८०० किलोमीटर लांबीची नवीन रेल्वे लाइन टाकण्यात येईल तसेच ८०० किलोमीटर लांबाची रेल्वे लाइन मीटर गेजमधून ब्रॉड गेजमध्ये रूपांतरित केली जाणार आहे. तसेच देशात ४ हजार कि.मी. दुहेरी रेल्वे मार्गाचे
जाळे विणण्यात येणार आहे. यासाठी ४७ हजार ९९७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
- 800किलोमीटर लांबीच्या नव्या रेल्वे लाइन टाकणार
- 1200ओव्हर ब्रिजसाठी ६०५० कोटींची तरतूद. पुलांसाठी ७४५ कोटी देणार
- उपनगरीय रेल्वेचे जाळे यंदा ६३.२२ कि.मी. वाढविणार
- 800कि.मी. रेल्वे लाइन ब्रॉड गेजमध्ये रूपांतरित करणार
विद्युतीकरण : रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी ६,९६० कोटींची तरतूद, तर सिग्नलिंग व इंटरलॉकिंग प्रणालीच्या सुधारणेसाठी १,७५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.