Union Budget 2022 For Solar Energy : सौर ऊर्जा उत्पादनासाठी 19,500 कोटी रुपयांची तरतूद; सोलर पॅनलवर भर देणार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 12:39 PM2022-02-01T12:39:59+5:302022-02-01T12:41:45+5:30
सीतारामन म्हणाल्या, सौर ऊर्जा उत्पादनासाठी या बजेटमध्ये 19,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. देशात कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्यानंतरचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. देश कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत असतानाच, आज निर्मला सीतारमन अर्थसंकल्प सादर करत आहेत या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यावेळी सीतारामन यांनी देशातील उर्जा क्षेत्रसंदर्भात सौर ऊर्जा (Solar Energy) उत्पादनावरही भाष्य केले. (Union Budget 2022 For Solar Energy)
सीतारामन म्हणाल्या, सौर ऊर्जा उत्पादनासाठी या बजेटमध्ये 19,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आणि देशात इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवे चार्जिंग स्टेशन्स तयार करण्यात येणार आहेत. देशात सौर ऊर्जेसाठी सोलर पॅनलवर आधारीत वीज प्रोजेक्ट्सच्या विकासावर भर दिला जाईल.
याच वेळी AI तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान आणि सेमी कंडक्टर्समध्ये प्रचंड शक्यता आहेत. त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. तंत्रज्ञानाचा वापर शेतीतही होईल. 'किसान ड्रोन'चा वापर करू शकतील. याच्या सहाय्याने पीक मूल्यांकन, भूमी अभिलेख, कीटनाशकांची फवारणीही केली जाऊ शकेल, असेही निर्मला सीतारामन म्हणाल्या.
बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी -
देशातील मोठ्या शहरांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरासाठी बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी आणली जाणार आहे. यामुळे देशात इलेक्ट्रीक वाहने वापरण्याचे प्रमाण वाढेल. असेही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. सध्या देशात इलेक्ट्रीक वाहनांसाठी मोठी मागणी आहे. परंतू चार्जिंग स्टेशनची कमतरता असल्याने याकडे लोक मोठ्या प्रमाणावर वळत नाहीएत. शहरांमध्ये जागा अपुरी असल्याने मोठ्या प्रमाणावर चार्जिंग स्टेशन उभारू शकत नाही. यामुळे शहरांसाठी बॅटरी स्वॅपिंग योजना आणली जाणार आहे.