Union Budget 2022 Sports: 'क्रीडा बजेट' वाढलं, पण 'नेहरू-राजीव' नावं असलेल्या संस्थांच्या निधीला कात्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 05:37 PM2022-02-01T17:37:59+5:302022-02-01T17:52:00+5:30
क्रीडा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात सुमारे ३०० कोटींची भरघोस वाढ
Union Budget 2022 Sports Sector: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळचा अर्थसंकल्प हा खेळाडू आणि क्रीडा संघटनांसाठी फायद्याचा विषय ठरला असून क्रीडा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात सुमारे ३०० कोटींची भरघोस वाढ करण्यात आली आहे. मात्र, क्रीडा अर्थसंकल्पाचा संपूर्ण तपशील पाहिल्यास काही संस्थांना मिळणारा निधी कमी करण्यात आले आहेत.
बजेटचा संपूर्ण तपशील पाहता नेहरू युवा केंद्र संघटना आणि राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्थेच्या क्रीडा बजेटमध्ये कपात करण्यात आली आहे. २०२१-२२ मध्ये नेहरू युवा केंद्र संघटनेचे बजेट ३६५ कोटी रुपये होते, ते यंदा ३२५ कोटी करण्यात आले आहे. तर राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ यूथ डेव्हलपमेंटचे बजेटही एक कोटी रुपयांनी कमी करून ते २५ कोटींवरून २४ कोटी करण्यात आले आहे.
नेहरू युवा केंद्र संघटनेच्या अंतर्गत ग्रामीण युवकांमधील कौशल्य विकासाशी संबंधित प्रकल्प येतात. तामिळनाडूतील राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्थादेखील अशाच प्रकल्पांवर काम करते.
कॉमनवेल्थ गेम्सशी संबंधित बजेटमध्ये कपात
यंदा क्रीडा अर्थसंकल्पात राष्ट्रकुल खेळांशी संबंधित बजेटमध्येही कपात करण्यात आली आहे. गतवर्षी संबंधित बजेट १०० कोटींचे होते, मात्र यावेळी ते केवळ ३० कोटींचे असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या वर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहेत, असे असतानाही बजेट कमी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.