Union Budget 2023: अर्थसंकल्पात मोदी सरकारची मोठी घोषणा; देशभरात 50 नवीन एअरपोर्ट उभारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 01:32 PM2023-02-01T13:32:08+5:302023-02-01T13:42:09+5:30
Union Budget 2023: करपात्र उत्पन्नाची मर्यादा 2 लाखांनी वाढवली आहे. आता 7 लाखांपर्यंतंच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही.
Union Budget 2023: आज(दि.1) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाच अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मोदी सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यातील एक घोषणा म्हणजे, देशात 50 नवीन विमानतळ सुरू करण्यात येणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की, देशात 50 अतिरिक्त विमानतळ, हेलीपोर्ट बांधले जाणार आहेत. यासह, सरकार प्रगत लँडिंगला पुनरुज्जीवन करण्याचे कामही करेल. सरकारने आपल्या UDAN योजनेला आणखी चालना देण्याच्या उद्देसानेच 50 नवीन विमानतळ सुरू करण्याची घोषणा केली आहे.
महिलांसाठी काय
याशिवाय अर्थमंत्र्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. महिलांसाठी घोषणा करताना त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत महिला सन्मान बचत पत्राची घोषणा करण्यात येत असून त्याच्यासाठी नवीन बचत योजना येणार आहे. त्यात 2 वर्षांसाठी गुंतवणूक करता येईल, ज्यावर 7.5 टक्के व्याज दिले जाईल. कोणतीही महिला किंवा मुलगी खाते उघडू शकेल, पण त्यातून पैसे काढण्याच्या अटी असतील. या अर्थसंकल्पात महिलांच्या कल्याणासाठी उचलले जाणारे हे मोठे पाऊल आहे.
बजेटमध्ये काय महाग आणि काय स्वस्त
- खेळणी, सायकल, ऑटोमोबाईल्स स्वस्त होतील
- इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होतील
- परदेशातून येणाऱ्या चांदीच्या वस्तू महागणार
- देश स्वयंपाकघर चिमणी महाग होईल
- मोबाईल फोन, कॅमेरा लेन्स स्वस्त होतील
- सिगारेट महागणार
करदात्यांना मोठा दिलासा
मध्यम वर्गासाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे. करपात्र उत्पन्नाची मर्यादा आता 2 लाखांनी वाढवली आहे. याआधी 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते, आता 7 लाखांपर्यंतंच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.
ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी
सीनिअर सिटीझन अकाऊंट स्कीमची मर्यादा साडेचार लाखांवरून वाढवून 9 लाख रुपये करण्यात आली आहे. याचाच अर्थ ज्येष्ठ नागरिक या स्कीममध्ये कमाल 4.5 लाखांऐवजी 9 लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करू शकतात. याशिवाय संयुक्त खात्यात कमाल रक्कम जमा करण्याची मर्यादा वाढवून ती 15 लाख रुपये करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली.