“हा अर्थसंकल्प म्हणजे ‘PM सरकार बचाओ योजना’, महाराष्ट्रासाठी काहीच नाही”; ठाकरे गटाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 01:57 PM2024-07-23T13:57:53+5:302024-07-23T14:01:17+5:30
MP Priyanka Chaturvedi On Union Budget 2024: महाराष्ट्राच्या गरजा, मागण्या याबाबत महायुती सरकार अवाक्षर काढत नाही. ही शरमेची गोष्ट आहे, अशी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली.
MP Priyanka Chaturvedi On Union Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये विद्यार्थी वर्ग, तरुण, शेतकरी, महिला, स्टार्टअप यांसाठी अनेकविध योजना घोषित केल्या. तसेच काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. कररचनेत बदल करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, बिहार तसेच ओडिशा राज्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यावरून आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी महाराष्ट्रासाठी कोणतीही घोषणा केली नसल्यावरून टीका केली आहे.
देशात तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना मोदी सरकारने रिटर्न गिफ्ट दिले आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना बिहार आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी निर्मला सीतारामन यांनी मोठ्या निधीची घोषणा केली आहे. यावरून काँग्रेसनंतर आता ठाकरे गटाकडून टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
हा अर्थसंकल्प म्हणजे ‘PM सरकार बचाओ योजना’
मीडियाशी बोलताना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे की, मला वाटते की, या अर्थसंकल्पाला 'पंतप्रधान सरकार बचाव योजना' म्हणायला हवे. कारण त्यांना हे लक्षात आले आहे की, पुढील ५ वर्षांसाठी हे सरकार वाचवायचे असेल तर त्यांच्या मित्रपक्षांना आनंदी ठेवण्याची गरज आहे. बिहार आणि आंध्र प्रदेशला विशेष दर्जा नाकारल्यानंतर केंद्र सरकारने त्यांना निधी दिला. केंद्राकडून महाराष्ट्राकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे. महाराष्ट्रातून पैसा हवा आहे. परंतु, महाराष्ट्रातील विकास, योजना यांसाठी काही नाही, अशी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली.
दरम्यान, महाराष्ट्रातील महायुती एनडीएचा घटक पक्ष आहे. परंतु, महाराष्ट्राच्या गरजा, मागण्या याबाबत सरकार अवाक्षर काढत नाही. ही शरमेची गोष्ट आहे, अशी टीका ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली.