तरुणांसाठी 'मेरा युवा भारत' संस्था स्थापन करणार, मोदी मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 04:39 PM2023-10-11T16:39:01+5:302023-10-11T16:39:29+5:30
सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त हे व्यासपीठ सुरू होणार आहे, असे अनुराग ठाकुर यांनी सांगितले.
नवी दिल्ली : मोदी मंत्रिमंडळाने तरुणांसाठी 'मेरा युवा भारत' संस्था तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात १५ ते १९ वयोगटातील सुमारे ४० कोटी तरुण आहेत. या तरुणांसाठी 'मेरा युवा भारत' (MyBharat) नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील तरुणांना त्यांची जबाबदारी समजते. पंचप्राणमधील कर्तव्याच्या भावनेबद्दलही भाष्य पंतप्रधान करत असतात, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सर्वात मोठी लोकसंख्या तरुणांची आहे. १५ ते १९ वयोगटातील ४० कोटी तरुण आहेत. ही भारताची मोठी ताकद आहे. 'मेरा युवा भारत' नावाची संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य, शिक्षण, स्वच्छता या क्षेत्रात कोणाला योगदान द्यायचे असेल तर या व्यासपीठाचा मोठा आधार असेल. देशातील कोट्यवधी तरुणांनी यात सहभागी होऊन योगदान द्यावे, अशी पंतप्रधानांची इच्छा आहे. ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्राला समर्पित करण्यात येणार आहे. म्हणजेच सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त हे व्यासपीठ सुरू होणार आहे, असे अनुराग ठाकुर यांनी सांगितले.
स्वच्छ भारतने ७५ लाख किलो प्लास्टिक गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले होते, त्यानंतर आमच्या तरुणांनी १०० लाख किलो प्लास्टिकचे लक्ष्य गाठले. याअंतर्गत डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याची चर्चा आहे. भारताला विकसित आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी 'मेरा युवा भारत' प्रभावी ठरेल. युवा संवाद, युवा संसद, सांस्कृतिक कार्यक्रम, देवाणघेवाण कार्यक्रम अशा कामांसाठी हे व्यासपीठ प्रभावी ठरेल, असे अनुराग ठाकुर म्हणाले.
तसेच, कोविडच्या काळातही तरुणांनी उत्स्फूर्तपणे योगदान आणि सहकार्य केले आहे. तरुणांमध्ये सेवा आणि कर्तव्याची भावना आणि स्वावलंबी भारत बनवण्याची ध्यास असेल तर ते येत्या २५ वर्षांत भारताला विकसित भारत बनवण्यात मोठी भूमिका बजावू शकतात, असेही अनुराग ठाकुर यांनी सांगितले.