केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजपात फेरबदलाचे वारे

By admin | Published: December 31, 2015 12:20 AM2015-12-31T00:20:20+5:302015-12-31T00:20:20+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करू इच्छितात. भाजपाच्या पक्ष संघटनेचा चेहरामोहरा बदलण्याचाही त्यांचा इरादा आहे. तथापि, आपल्या विकास अजेंड्याला अनुरूप

Union Cabinet, BJP revisited | केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजपात फेरबदलाचे वारे

केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजपात फेरबदलाचे वारे

Next

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करू इच्छितात. भाजपाच्या पक्ष संघटनेचा चेहरामोहरा बदलण्याचाही त्यांचा इरादा आहे. तथापि, आपल्या विकास अजेंड्याला अनुरूप कामगिरी आश्वासकपणे बजावू शकतील, असे नवे चेहरे शोधणे अद्याप शक्य झालेले नाही, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. बिहार निवडणुकीतील दारुण पराभवानंतरच या प्रक्रियेला त्यांनी प्रारंभ केला असून, मकर संक्रांतीनंतर सरकार व संघटनेत काही खास फेरबदल घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
देशातील बेरोजगारी दूर करण्याचे व विकासाच्या नव्या योजना कार्यान्वित करण्याचे आश्वासन देत, मोदी सरकार केंद्रात सत्तेवर आले. येत्या मे महिन्यात सरकारची दोन वर्षे पूर्ण होतील. तथापि, जनतेला अप्रूप वाटावे, अशी भव्य कामगिरी सरकारला अद्यापपावेतो काही करून दाखवता आलेली नाही. काही आक्रमक कट्टरपंथियांमुळे पक्ष संघटनेलाही विरोधकांचे हल्ले सहन करावे लागले. या पार्श्वभूमीवर सरकार व संघटनेची प्रतिमा लवकरात लवकर सुधारावी, असा संकल्प मोदींच्या मनात आहे. भाजपा अध्यक्षपदाची अमित शाह यांची मुदतही जानेवारी महिन्यात संपत आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर त्यांची पुन्हा निवड होते की नाही, याविषयीदेखील तर्कवितर्क केले जात आहेत. या दोन्हींतून येत्या मकर संक्रांतीनंतर मार्ग निघू शकतो, अशी सूत्रांची अपेक्षा आहे.
मोदी मंत्रिमंडळात सध्या ६६ मंत्री आहेत. त्यात उत्तरप्रदेशातील १३, बिहारचे ८ व महाराष्ट्रातले ७ मंत्री आहेत. मंत्रिमंडळात वकील, डॉक्टर, इंजिनीअर, चार्टर्ड अकाउंटंट, अर्थतज्ज्ञ असे ३४ जण आहेत. मंत्रिमंडळात ८ महिलांचाही समावेश आहे. मे २0१४ मध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्यानंतर, नोव्हेंबर २0१४ मध्ये शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेले सुरेश प्रभू व गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचा समावेश करून, मोदींनी त्यांच्याकडे अनुक्रमे रेल्वे व संरक्षण खात्याची जबाबदारी सोपवली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नव्या फेरबदलात मोदी अरुण जेटलींकडे पुन्हा संरक्षण खाते सोपवू इच्छितात. मात्र, अर्थ खात्यासाठी सुयोग्य व्यक्तीचा शोध अजून संपलेला नाही. वादग्रस्त विधाने करून, सरकारला अडचणीत आणणाऱ्या गिरीराजसिंग व निरंजन ज्योतींची मंत्रिमंडळातून गच्छंती होऊ शकते.
२0१६ साली देशातल्या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यात आसाम वगळता अन्य राज्यात भाजपला फारसे भवितव्य नाही. २0१७ साली उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पंजाब आदी राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर भाजपचे सारे लक्ष सध्या केंद्रित आहे.
त्यापूर्वी पक्षाची व केंद्र्र
सरकारची इमेज बदलण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. जानेवारी महिन्यात भाजप व संघपरिवाराची या संदर्भात चर्चा होऊ शकते. मकर संक्रांतीनंतर मंत्रिमंडळात व संघटनेत काही महत्त्वाचे फेरबदल होऊ शकतील, अशी शक्यता आहे.

Web Title: Union Cabinet, BJP revisited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.