केंद्रीय मंत्रिमंडळाने 'इंडिया' शब्द हटवला? रेल्वेच्या प्रस्तावात सर्वत्र 'भारत'चा उल्लेख!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 18:11 IST2023-10-28T18:09:47+5:302023-10-28T18:11:36+5:30
रेल्वे मंत्रालयाचा हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिला प्रस्ताव आहे, ज्यामध्ये 'इंडिया' ऐवजी 'भारत' हा शब्द वापरण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने 'इंडिया' शब्द हटवला? रेल्वेच्या प्रस्तावात सर्वत्र 'भारत'चा उल्लेख!
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर केलेल्या प्रस्तावात रेल्वे मंत्रालयाने 'इंडिया' ऐवजी 'भारत' हा शब्द वापरला आहे. केंद्र सरकार 'इंडिया' ऐवजी 'भारत' नावाला प्राधान्य देत असताना रेल्वे मंत्रालयाने हा बदल केला आहे. अनेक संस्था त्याचा प्रचारही करत आहेत. रेल्वे मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, आपल्या संविधानात 'इंडिया' आणि 'भारत' या दोन्ही नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत मंत्रिमंडळाच्या प्रस्तावात 'भारत' हे नाव वापरणे कोणत्याही प्रकारे चुकीचे नाही.
दरम्यान, रेल्वे मंत्रालयाचा हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिला प्रस्ताव आहे, ज्यामध्ये 'इंडिया' ऐवजी 'भारत' हा शब्द वापरण्यात आला आहे. लॉजिस्टिक कॉस्टपासून ते कार्गो आणि इतर गोष्टींचा उल्लेख करताना 'भारत' हा शब्द सर्वत्र वापरला गेला आहे. रिपोर्टनुसार, आगामी काळात केंद्र सरकारच्या सर्व कागदपत्रांमध्ये 'इंडिया' ऐवजी 'भारत' हा शब्द वापरण्यात येणार आहे.
दुसरीकडे, 'भारत' हे शतकानुशतके जुने नाव आहे. 'भारत' हे नाव सात हजार वर्षे जुन्या विष्णु पुराणसारख्या प्राचीन ग्रंथात वापरले गेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) सर्व पाठ्यपुस्तकांमधील 'इंडिया' नाव बदलून 'भारत' करण्याची शिफारस गेल्या बुधवारी एनसीईआरटीच्या एका समितीने एकमुखाने पारित केली.
एनसीईआरटीने ही शिफारस स्वीकारल्यास नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये तसा बदल दिसण्याची शक्यता आहे. पद्मश्री सी.आय. इसाक यांच्या अध्यक्षतेखालील एनसीईआरटीच्या समाजशास्त्रावरील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत 'इंडिया' ऐवजी 'भारत' नाव करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. दिल्लीत सप्टेंबर महिन्यात झालेल्या जी-२० देशांच्या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 'इंडिया' ऐवजी 'भारत' नावाचा अवलंब केला होता.