या महिन्याच्या अखेरीस केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार?, पक्षसंघटनेतही फेरबदलाच्या शक्यतेने मंत्री, भाजपमध्ये अस्वस्थता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 05:57 AM2023-01-06T05:57:39+5:302023-01-06T08:16:37+5:30
कोणते मंत्री बाहेर जाणार व कोणाला स्थान मिळणार, याबाबत कोणालाच निश्चित कल्पना नसल्यामुळे नेते व मंत्र्यांमध्ये उत्सुकता आहे.
- संजय शर्मा
नवी दिल्ली : येत्या १७ जानेवारीनंतर केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ व भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक फेरबदल होण्याच्या शक्यतेने भाजपचे नेते व केंद्रीय मंत्र्यांमध्ये अस्वस्थता आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारमध्ये अंतिम फेरबदलाची शक्यता वर्तविली जात आहे. हा फेरबदल १७ जानेवारी ते ३१ जानेवारीदरम्यान कधीही होऊ शकतो. कोण राहणार, कोण जाणार, कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून पक्षांतर्गत चर्चाही सुरू झाल्या आहेत.
कोणते मंत्री बाहेर जाणार व कोणाला स्थान मिळणार, याबाबत कोणालाच निश्चित कल्पना नसल्यामुळे नेते व मंत्र्यांमध्ये उत्सुकता आहे. तथापि, २०२४च्या निवडणुका लक्षात घेऊन मंत्रिमंडळ विस्तार झाला तर ज्या राज्यांत भाजपची स्थिती कमजोर आहे, अशा राज्यांतील प्रतिनिधींना मंत्रिमंडळात घेतले जाऊ शकते. सध्या अनेक मंत्र्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणाला नारळ देणार व कोणाला मंत्री करणार, याची खबरबात कोणालाच नाही. २०२४च्या निवडणुका लक्षात घेऊन काही ज्येष्ठ मंत्र्यांना सरकारमधून पक्षात पाठविले जाईल, एवढे मात्र निश्चित आहे. तथापि, हे मंत्री कोण असतील, हे आता कोणालाच माहिती नाही.
पक्ष संघटनेत काय बदल?
मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच भाजपमध्ये फेरबदल होणार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बदलले जातील. उपाध्यक्ष, राज्यांचे प्रभारी बदलले जातील, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.
कुणाला लागेल लॉटरी?
- महाराष्ट्रातील शिंदे गटाच्या खासदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणे निश्चित समजले जात आहे.
- चिराग पासवान यांना बिहारची स्थिती लक्षात घेऊन स्थान देणे निश्चित मानले जात आहे.
- पश्चिम बंगालमध्ये बाबूल सुप्रियो यांच्या जागी लॉकेट चटर्जी व दिलीप घोष यांच्या नावांची चर्चा आहे.
यूपीत काेण प्रभारी?
सर्वांत प्रमुख उत्तर प्रदेश राज्य मानले जाते. कारण तेथे लोकसभेच्या ८० जागा आहेत व एखाद्या धडाडीच्या नेत्याला प्रभारी केले जाईल, अशी शक्यता आहे.
जे. पी. नड्डा यांच्यानंतर भाजप संघटनेत गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांचे वजन वाढले आहे. त्यांना राष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण जबाबदारी मिळणे निश्चित समजले जाते.
काही केंद्रीय मंत्री, माजी केंद्रीय मंत्र्यांना भाजपमध्ये प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. ते माध्यमांमध्ये पक्ष व सरकारची बाजू मांडण्याचे काम करतील.
धक्कातंत्राची शक्यता अधिक
- पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवेळी कोणता ना
कोणता आश्चर्याचा धक्का देतात, याहीवेळी ते नक्की आश्चर्याचा धक्का देतील, असे समजले जात आहे.
- जेव्हा जेव्हा माध्यमांत एखाद्या गोष्टीबद्दल जास्त चर्चा होते, तेव्हा पंतप्रधान ते टाळतात. यावेळीदेखील तसे होण्याची दाट शक्यता आहे.