ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राकडून खूशखबर, साखर निर्यातीवर मिळणार अनुदान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 07:52 PM2019-08-28T19:52:07+5:302019-08-28T19:52:13+5:30
देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने खूशखबर दिली आहे.
नवी दिल्ली - देशभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने खूशखबर दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्थव्यवस्थेत आलेली सुस्ती आणि शेतीक्षेत्राच्या होत असलेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी अनुदान देण्याची घोषणा केली आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.
Union Minister Prakash Javadekar: The Union Cabinet has approved Sugar export policy for evacuation of surplus stocks during sugar season 2019-20; nearly 60 lakh tonnes sugar to be exported in this financial year pic.twitter.com/JeOcy0DTPf
— ANI (@ANI) August 28, 2019
''ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने साखरेच्या निर्यातीवर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एकूण 60 लाख मेट्रिक टन साखरेच्या निर्यातीवर हे अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 6 हजार कोटी रुपये खर्च येईल,''असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
दरम्यान, आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इतर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ते पुढील प्रमाणे
- देशभरात 75 वैद्यकीय महाविद्यालये उघडण्याचा निर्णय, वैद्यकीय क्षेत्राला फायदा
- ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी साखरेच्या 60 लाख मेट्रिक टनपर्यंतच्या निर्यातीसाठी अनुदान
- आपत्तींना तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटना स्थापण्याची तयारी, पंतप्रधान संयुक्त राष्ट्रांमध्ये जाऊन याची सुरुवात करतील
- देशात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील
- लहान-मोठ्या कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिगमध्ये 100 टक्के एफडीआयला मंजुरी
- प्रिंट मीडियाप्रमाणेच डिजिटल मीडियामध्येही 26 टक्के गुंतवणुकीस मान्यता