केंद्रीय मंत्रिमंडळात उद्या फेरबदल होणार?; विरोधी एकतेत मोठी फूट पडण्याची चिन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 09:38 AM2023-07-11T09:38:38+5:302023-07-11T09:39:14+5:30
नितीशकुमारांशी मागच्या दरवाजाने चर्चा बिहारमध्ये भाजपने पुन्हा एकदा आपले जुने सहकारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासोबत मागच्या दरवाजाने चर्चा सुरू केली आहे.
संजय शर्मा
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याच्या चर्चा सुरू असतानाच आता यासाठी १२ जुलैचा मुहूर्त काढला असल्याचे सांगितले जात आहे. सरकारमधील सूत्रांचे म्हणणे आहे की, फ्रान्सला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या मंत्रिमंडळात फेरबदल करू शकतात. पंतप्रधान मोदी दि. १३ आणि १४ जुलै रोजी दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत. याआधी दि. १९ जुलै ही तारीख निश्चित झाल्याचे सांगितले जात होते; पण एनडीएच्या मित्रपक्षांमध्ये मंत्र्यांच्या नावांवर एकमत होऊ शकले नाही.
सर्वात मोठी अडचण महाराष्ट्रातच आहे. महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी शिवसेना शिंदे गट किमान १२ ते १५ जागांवर दावा करत आहे. राष्ट्रवादीतील अजित पवार गट दहा जागांवर दावा करत आहे. तथापि, महाराष्ट्रात भाजपाला लोकसभेच्या २८ ते ३० जागा लढायच्या आहेत. एक जागा रामदास आठवलेंच्या आरपीआयला द्यायची आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातील काही खासदारांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, असा भाजपचा प्रयत्न आहे. जेणेकरून, त्यांची संख्या अधिक दिसेल. भलेही उमेदवार शिवसेनेचा असो.
पंजाबमध्ये अकाली दलासोबत भाजपचे युतीसाठी प्रयत्न सुरू आहेत; पण ही चर्चा जागांवर अडली आहे. भाजप पूर्वी ११ पैकी दोन जागा लढवित होता; पण आता पाच जागा मागत आहे. भाजपला २ ते ४ जागांवर रोखण्याचा अकाली दलाचा प्रयत्न आहे. येथेही भाजप अकाली दलाच्या काही उमेदवारांना भाजपच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरविण्याच्या प्रयत्नात आहे.
तेलुगू देसमचे चंद्राबाबू नायडू यांच्याशीही चर्चा झाली आहे. येत्या २४ तासांत चित्र स्पष्ट होईल. सर्व काही सुरळीत राहिल्यास १२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलमध्ये शपथविधी सोहळा होऊ शकतो.
नितीशकुमारांशी मागच्या दरवाजाने चर्चा बिहारमध्ये भाजपने पुन्हा एकदा आपले जुने सहकारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासोबत मागच्या दरवाजाने चर्चा सुरू केली आहे. यावेळी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह हे चर्चेचे सूत्रधार ठरले आहेत. हरिवंश नारायण सिंह हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश घेऊन यापूर्वी मुख्यमंत्री नितीशकुमार भेटायला आले होते. जनता दल यूनायटेडशी बोलणी झाली, तर त्यांच्या एक-दोन सदस्यांना कॅबिनेटमध्ये स्थान द्यावे लागेल