भारतीय कंपन्यांना दरवर्षी आपल्या ताफ्यात ११० विमानं समाविष्ट करावी लागतील : ज्योतिरादित्य शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 11:15 AM2022-03-26T11:15:25+5:302022-03-26T11:16:07+5:30
नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Minister Jyotiraditya Scindia) यांनी कोरोनाच्या महासाथीमुळे (Coronavirus Pandemic) प्रभावित झालेल्या विमान वाहतूक क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येण्याची आशा व्यक्त केली आहे.
Minister Jyotiraditya Scindia : नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Minister Jyotiraditya Scindia) यांनी कोरोनाच्या महासाथीमुळे (Coronavirus Pandemic) प्रभावित झालेल्या विमान वाहतूक क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येण्याची आशा व्यक्त केली आहे. जर सर्व काही ठीक झाले तर भारतीय कंपन्यांना त्यांच्या ताफ्यात दरवर्षी ११० ते १२० नवीन विमाने सामील करावी लागतील. विंग इंडिया २०२२ या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते उपस्थित होते. "कंपन्यांना अनेक नवीन जागतिक क्षेत्रांमध्ये उड्डाणास सुरुवात करायची असल्यास त्यांना त्यांच्या ताफ्यात मोठ्या आकाराची विमाने समाविष्ट करावी लागतील," असं ते यावेळी म्हणाले.
"पुढील वर्षापर्यंत देशांतर्गत प्रवाशांची संख्या दररोज ४.१० लाख प्रवासी इथपर्यंत पोहोचेल. २०२४-२५ पर्यंत प्रवाशांची संख्या विक्रमी पातळीवर जाईल," अशी आशा ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केली. “भारताचे विमान वाहतूक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तार करत आहे. ना केवळ विमान कंपन्यांची संख्या वाढत आहे, तर विमानतळांची संख्याही वाढत आहे. अशातच कंपन्यांना आपल्या ताफ्यात नव्या विमानांचा समाविष्ट करणं आवश्यक असेल, असंही ते म्हणाले.
"२०१३-१४ मध्ये सर्व कंपन्यांकडे मिळून ४०० विमानं होती. परंतु गेल्या वर्षी ती वाढून ७१० झाली. सध्या भारतात ९ हजारांपेक्षा अधिक वैमानिक आहेत आणि यापैकी १५ टक्के महिला आहेत. ही संख्या जागतिक प्रमाणापेक्षा पाच टक्के अधिक आहे," असंही ते म्हणाले. भारताला पुढील २ दशकांमध्ये २२०० विमानांची गरज भासेल असं युरोपियन कंपनीला वाटत असल्याचं एअरबसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं गुरूवारी सांगितलं होतं.
प्रवाशांची संख्या वाढतेय
"देशांतर्गत दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या ३९ लाख होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान ती घसरून ११ लाख झाली होती. परंतु आता पुन्हा एकदा ही संख्या ३८ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांबद्दल सांगायचं झालं तर २०१८-१९ मध्ये ती सहा कोटी होती, परंतु कोरोनानंतर ती संख्या घसरून १ कोटी झाली," असंही शिंदे म्हणाले. २७ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुन्हा सुरू झाल्यावर अन्य देशांशी पुन्हा जोडले जाऊ असंही ते म्हणाले.