अरुणाचलमधील तीन जिल्हे 'अशांत', केंद्रानं लागू केला अफस्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2018 09:43 AM2018-10-04T09:43:33+5:302018-10-04T09:43:49+5:30
केंद्र सरकारनं अरुणाचलमधील तीन जिल्ह्यांना 'अशांत' जाहीर करून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) लागू केला आहे.
नवी दिल्ली- केंद्र सरकारनं अरुणाचलमधील तीन जिल्ह्यांना 'अशांत' जाहीर करून सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा (अफस्पा) लागू केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं बुधवारी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेत तिरप, चांगलांग आणि लोंगडिंग जिल्ह्यांना अशांत घोषित केलं आहे. अरुणाचल आणि आसाम सीमेवर असलेल्या 8 पोलीस स्टेशनांच्या अंतर्गत येणा-या काही भागालाही संवेदनशील जाहीर केलं आहे.
तिरप, चांगलांग, लोंगडिंग जिल्ह्ये आणि आसाम सीमेवरून 8 पोलीस स्टेशनांतर्गत येणा-या भागाला संवेदनशील घोषित केलं आहे. या तिन्ही जिल्ह्यांत 1958चं कलम 3 अंतर्गत केंद्र सरकारनं 31 मार्च 2019पर्यंत अफस्पा लागू केला आहे. 1 ऑक्टोबर 2018पासून अफस्पा लागू झाला आहे, असं केंद्र सरकारनं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे.
तत्पूर्वी आसामचे गव्हर्नर जगदीश मुखी यांनी 3 ऑगस्ट रोजी राज्यात अफस्पा पुढच्या सहा महिन्यांसाठी वाढवत असल्याची घोषणा केली होती. अफस्पा या अॅक्टअंतर्गत संवेदनशील क्षेत्रात सुरक्षा जवानांना विशेषाधिकार बहाल केले जातात. या अॅक्टअंतर्गत सशस्त्र दलाला चौकशी करणे, अटक करणे आणि बळाच्या वापरासाठी जास्त स्वातंत्र्यता दिली जाते.