सामान्य नागरिक बनून रुग्णालयात गेलेल्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सुरक्षा रक्षकाची मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 04:49 PM2021-09-19T16:49:13+5:302021-09-19T16:53:41+5:30
Mansukh Mandaviya: सफदरगंज रुग्णालयात मनसुख मांडविया यांना गार्डने शिव्या देत काठीने मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी आज एक धक्कादायक खुलासा केला. काही दिवसांपूर्वी ते अचानक सफदरगंज रुग्णालयात एक सामान्य नागरिक म्हणून तपासणी करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना रुग्णालयातील एका गार्डने काठीने मारहाण केली. याच सफदरगंज रुग्णालयातील चार आरोग्यविषयक सुविधांच्या उद्घाटन समारंभात मांडविया यांनी हा खुलासा केला आहे.
या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांना रुग्णालयातील अनेक गैरसोयी अधोरेखीत करुन दिल्या. याशिवाय, रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये सुधारणा करुन रुग्णालयातील गैरप्रकार दूर करावेत आणि रुग्णालयाला मॉडेल हॉस्पिटल बनवावे, असे निर्देशही हॉस्पिटल प्रशासनाला दिले आहेत.
https://t.co/XgcyXpsLcN
— Lokmat (@MiLOKMAT) September 19, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी देशभरात 2.5 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली होती.#coronavirus#NarendraModi#RahulGandhi
गार्डने काठी का मारली ?
उद्घाटन समारंभात डॉ.मांडाविया म्हणाले की, रुग्णालयात ते एक सामान्य रुग्ण म्हणून तपासणी करण्यासाठी आले होते. यावेळी ते एका बाकावर बसत असताना गार्डने बाकावर बसू नको असे म्हणत, शिव्या दिल्या आणि काठीने मारहाण केली. याशिवाय, रुग्णालयात इतर रुग्णांना स्ट्रेचर आणि इतर वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात भटकावं लागत आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयात आलेल्या एका 75 वर्षीय महिलेचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, महिला आपल्या मुलासाठी स्ट्रेचर मिळवण्यासाठी एका गार्डकडे विनवणी करत होती, पण महिलेला स्ट्रेचर दिले नाही. कार्यक्रमादरम्यान त्यांनी रुग्णालयातील गार्डच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली.
पंतप्रधान मोदींना दिली घटनेची माहिती
मांडविया यांनी या सर्व प्रकाराची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदीना दिल्याचही सांगितलं. मांडविया म्हणाले की, मला मारहाण झालेला किस्सा ऐकून मोदींनाही धक्का बसला. त्यांनी काठी मारणाऱ्या गार्डला निलंबित केलं आहे की नाही, अशी विचारणा केली. त्यावर मी त्यांना सांगितलं की, मला एका गार्डला निलंबित न करता संपूर्ण सिस्टीममध्ये सुधारणा करायची आहे, असं मांडविया म्हणाले.