Coronavirus Vaccine : लसींच्या पुरवठ्यावरून महाराष्ट्र, छत्तीसगढमध्ये राजकारण, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 08:34 AM2021-04-11T08:34:50+5:302021-04-11T08:38:17+5:30
राज्य पातळीवर आम्ही लसीचे डोस देतो. लसींच्या वितरणाबाबत कोणतंही राजकारण नाही, आरोग्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला महाराष्ट्राला मोठा फटका बसताना दिसत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेली लसीकरण मोहीम मंदावल्याचं दिसून आलं होतं. तसंच महाराष्ट्र, छत्तीसगढसारख्या राज्यांमधून आपल्याला लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याचा आरोपही करण्यात आला होता. यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "आम्ही राज्य स्तरावर लसींचा पुरवठा करत आहेत. त्या लसी सेंटर्सपर्यंत पोहोचवणं हे त्या राज्याचं काम आहे. वितरणाबाबत कोणतंही राजकारण करण्यात आलं नाही," असं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलं.
राज्यांना लसींचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याच्या आरोपांवर डॉ. हर्षवर्धन यांना सवाल करण्यात आला. "आम्ही राज्यांच्या पातळीवर लसींचा पुरवठा करत आहोत. त्या लसी लसीकरण केंद्रांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. जर कोणत्याही राज्यानं योग्य प्रकारे तयारी केली नाही आणि त्यामुळे जर लसींचे डोस वाया जात असतील तर हे त्या राज्य सरकारचं अपयश आहे. लसींच्या वितरणाबाबत कोणतंही राजकारण केलं जात नाही," असंही डॉ. हर्षवर्धन म्हणाले. त्यांनी आजतकला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं.
महाराष्ट्र, छत्तीसगढमध्ये राजकारण
"कोवॅक्सिनबाबक महाराष्ट्र आणि छत्तीसगढमध्ये विशेषकरून राजकारण होत होतं. छत्तीसगढला तर आम्ही जानेवारी महिन्यातचं लसींचा पुरवठा केला होता. परंतु त्यांनी ३ महिने लसीकरणाला सुरूवातच केली नाही. दोन वेळा मी त्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिलं. परंतु ३ महिन्यापर्यंत केवळ राजकारण सुरू होतं. लोकांना लसीकरण करण्यात आलं नाही. मार्च अखेरिस त्यांनी लसीकरणाला सुरूवात केली," असं त्यांनी नमूद केलं.
महाराष्ट्राला सर्वाधिक लसी
आजपर्यंत जर कोणत्या राज्याला आम्ही सर्वाधिक लसी दिल्या असतील तर ते राज्य महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान ही ३ अशी राज्ये आहेत ज्यांना १ कोटी पेक्षा अधिक लसींच्या डोसचा पुरवठा करण्यात आला. कोरोना लसीकरणाचा राज्यांच्या लोकसंख्येशी काही संबंध नाही. ते अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. जर तुम्ही लोकसंख्येच्या दृष्टीनं पाहिलं तर उत्तर प्रदेशला सर्वाधिक लसी मिळायला हव्या होत्या. परंतु तसं झालं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
सरासरी लसीकरण अमेरिकेपेक्षाही अधिक
"लसीकरण मोहीम ही एक डायनॅमिक प्रोसेस आहे. ती नंबर्सच्या आधारावर पाहता येणार नाही. आपल्याकडे देशात दिवसाला होणारं लसीकरण हे अमेरिकेपेक्षाही अधिक आहे. आपण सर्वात जलद गतीनं आणि सर्वात कमी वेळा ९ कोटी लोकांचं लसीकरण पूर्ण केलं आहे," अशी माहितीही डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. लसीकरण एक सायंटिफिक प्रोसेस असून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ते पहिले ज्येष्ठ नागरिक किंवा काही आजार असलेल्या लोकांना देणं अपेक्षित आहेत. त्या आधावरच आम्ही सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरूवात केली आणि त्यानंतर त्याची व्याप्ती वाढवल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.