Corona Vaccination : 5 ते 15 वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 05:03 PM2022-02-12T17:03:12+5:302022-02-12T17:23:58+5:30
Corona Vaccination : भाजपने सर्वसाधारण अर्थसंकल्पावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया गांधीनगरमध्ये आले होते.
गांधीनगर : पाच ते 15 वयोगटातील मुलांना कोरोना लसीचे डोस देण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी भाष्य केले. ते म्हणाले की, तज्ज्ञांच्या समूहाने शिफारस केल्यावर सरकारकडून या वयोगटासाठी मुलांचे लसीकरण सुरू करण्यात येईल. मात्र, तज्ज्ञांच्या समूहाकडून याबाबत अद्याप कोणतीही शिफारस केलेली नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी गुजरातची राजधानी गांधीनगरमध्ये ही माहिती दिली. भाजपने सर्वसाधारण अर्थसंकल्पावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया गांधीनगरमध्ये आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, 'कोणत्या वयोगटात, कधीपासून लसीकरण सुरू करायचे, हे तज्ज्ञांच्या समूहाच्या शिफारशींच्या आधारे ठरवले जाते. या तज्ज्ञांच्या समूहाकडून मुलांसाठी शिफारस प्राप्त होताच आम्ही त्याची तात्काळ अंमलबजावणी करू.'
दरम्यान, देशात गेल्या महिन्यात 15 ते 18 वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरू झाले. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, 'आज लसीकरण हा मुद्दा नाही. आमच्याकडे पुरेशा लसी आहेत, डोसची कमतरता नाही. आम्ही निश्चितपणे तज्ज्ञांच्या समूहाच्या शिफारसींचे पालन करू. महामारीच्या तिसऱ्या लाटेत भारताने कोरोनाविरुद्धच्या युद्धात लसीकरणाचा प्रभावीपणे वापर केला आहे.'
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी भारत सरकारने लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत. त्या अंतर्गत 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तर 10 जानेवारी 2022 पासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स तसेच 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना लसीचा बूस्टर डोस (तिसरा डोस) देण्यास सुरूवात केली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण
काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी (12 फेब्रुवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 50,407 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रिकव्हरी रेट हा 97.37 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,10,443 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.