केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीत खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 03:41 PM2022-07-29T15:41:45+5:302022-07-29T15:42:14+5:30
Maharashtra Cabinet Expansion: बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत दाखल होणार, अशी बातमी दिल्लीत धडकली. काही तासांनंतर मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. परंतु मुख्यमंत्री शिंदे यांचे बुधवारी रात्री आगमन झाले.
नवी दिल्ली - महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर एक महिना झाला तरी कॅबिनेटचा विस्तार रखडला आहे. या दोन्ही नेत्यांनी ३० जून रोजी शपथ घेतली होती. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारही लवकरच होईल असं सांगण्यात आले. मात्र इतक्या दिवसानंतरही मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. परंतु बुधवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात गुप्त बैठक झाली. या बैठकीत खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपाच्या उच्चस्तरीय सूत्रांनुसार, लवकरच महाराष्ट्रात कॅबिनेट विस्तार होईल. शिंदे गट आणि भाजपा सरकारमधील खातेवाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. अंतर्गत रस्सीखेचामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबला होता आता बैठकीत त्यात मार्ग शोधला आहे. शिंदे गटाचे आणि भाजपाचे किती-किती मंत्री असतील? कुणावर काय जबाबदारी असेल? यावर दोन्ही पक्षाचे एकमत झाले आहे. ३१ जुलैनंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल असं सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्रिपद सांभाळल्यापासून एकनाथ शिंदे ५ वेळा दिल्लीला गेले आहेत. भाजपाच्या नेतृत्वासोबत त्यांची बैठक होत आहे. अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या शपथविधीला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दोघेही दिल्लीला गेले होते. त्यानंतरही मंत्रिमंडळ विस्ताराला वेग आला नव्हता. त्यानंतर शिंदे आणि शाह यांच्यात गुप्त बैठक झाल्याचं पुढे आले. याच बैठकीत ६०-४० असा खातेवाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं सूत्रांनी सांगितले.
बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत दाखल होणार, अशी बातमी दिल्लीत धडकली. काही तासांनंतर मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. परंतु मुख्यमंत्री शिंदे यांचे बुधवारी रात्री आगमन झाले. विमानतळावर मोजक्या अधिकाऱ्यांशिवाय कुणीही नव्हते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले. यावेळी मंत्रिमंडळात किती सदस्य असावे, तसेच मंत्रिमंडळ विस्तार केव्हा करायचा, यावरच चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. माध्यमांना हुलकावणी देण्यासाठी दौरा रद्द झाल्याची बातमी पेरण्यात आल्याचे आता उघड झाले आहे.
दोन-तीन दिवसांत विस्तार - गिरीश महाजन
राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार येत्या दोन-तीन दिवसांतच होईल, असा दावा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. ते सध्या दिल्लीत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात कोणतीही अडचण नसल्याचा दावाही त्यांनी केला.