“पुढील ३० ते ४० वर्षांपर्यंत राहणार भाजप युग,” राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीत अमित शाहंचं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 04:11 PM2022-07-03T16:11:40+5:302022-07-03T16:13:44+5:30
घराणेशाही, जातीयवाद आणि तुष्टीकरण हा देशाच्या राजकारणासाठी मोठा शाप असल्याचं शाह यांचं वक्तव्य.
“पुढील ३० ते ४० वर्षे भाजपचा काळ असेल आणि या काळात भारत विश्वगुरू बनेल. घराणेशाही, जातीयवाद आणि तुष्टीकरण हा देशाच्या राजकारणासाठी मोठा शाप आहे, जो देशासमोरील समस्यांना कारणीभूत आहे,” असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. अमित शाह यांनी हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत यावर भाष्य केलं.
तेलंगण आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये भाजप कौटुंबिक राजवट संपवेल आणि आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओडिशासह इतर राज्यांमध्ये सत्तेतही येईल, असे अमित शाह म्हणाले. २०१४ पासून केंद्रात सत्तेत असलेला भाजप या राज्यांमध्ये मात्र सत्तेत नाही.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक
सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिलेला निर्णय ऐतिहासिक असल्याचं शाह म्हणाले. यामध्ये दिवंगत खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी जाफीया जाफरी यांची याचिका न्यायालयानं फेटाळली होती. याचिकेत गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलींमध्ये तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह ६४ लोकांना एसआयटीनं दिलेल्या क्लिन चीटला आव्हान देण्यात आलं होतं. मोदी यांनी दंगलीमध्ये आपल्या कथित भूमिकेबाबत एसआयटी तपासाचा सामना केला होता आणि संविधानावर आपला विश्वास कायम ठेवला होता असं शाह म्हणाले.
काँग्रेस हा कुटुंबाचा पक्ष झाला आहे. त्यांचे काही सदस्य पक्षाच्या आतच लोकशाहीसाठी लढत आहे. गांधी कुटुंब अंतर्गत संघटनात्मक निवडणुका होऊ देत नाही. त्यांना पक्षावरील आपलं नियंत्रण गमावण्याची भिती आहे. विरोधक असंतुष्ट आहेत आणि सरकार जे काही चांगलं करतं, त्याचा ते विरोधच करत असतात, असा आरोपही त्यांनी केला.