"आम्ही CAA आणणारच, आम्हाला कोणीही रोखू शकत नाही", अमित शाहांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 03:46 PM2023-11-29T15:46:23+5:302023-11-29T15:52:45+5:30
Amit Shah on CAA : २०२६ मध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा दावा
नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAA) पुन्हा चर्चेत आले आहे. बुधवारी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एका रॅलीला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीएए संदर्भात मोठे विधान केले. आम्ही बंगालमध्ये सीएए आणणारच. हा देशाचा कायदा असून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. तसेच, पश्चिम बंगालमधीलममता बॅनर्जी यांच्या सरकारवर अमित शाह यांनी जोरदार हल्लाबोल केला.
बंगालच्या जनतेने ठरवले आहे की, पुढचे सरकार भाजपच बनवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालच्या जनतेला लाखो रुपये पाठवतात, पण तृणमूल काँग्रेस हे पैसे गरिबांपर्यंत पोहोचू देत नाही. तसेच, बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान सर्वाधिक हिंसाचार होताना दिसतो. बंगालमध्ये घुसखोरी थांबवली जात नाही. बंगालमध्ये बॉम्बस्फोटाचे आवाज येतायेत, असे अमित शाह म्हणाले.
बंगालमध्ये कम्युनिस्टांनी २७ वर्षे राज्य केले. तिसऱ्या टर्ममध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाले. दोघांनी मिळून बंगालला संपवण्याचे काम केले. संपूर्ण देशात निवडणुकीतील हिंसाचार बंगालमध्ये सर्वाधिक आहे. ममता बॅनर्जी बंगालमधील घुसखोरी रोखू शकलेल्या नाहीत. राज्यात घुसखोरांना मतदार कार्ड आणि आधार कार्ड खुलेआम वाटले जात असून यावर ममता बॅनर्जी गप्प बसल्या आहेत, असा आरोप अमित शाह यांनी केला.
सोनार बांगला आणि माँ माटी मानुषचा नारा देत कम्युनिस्टांना हटवून ममता दीदी सत्तेवर आल्या. पण बंगालमध्ये बदल झाला नाही. आजही बंगालमध्ये घुसखोरी, तुष्टीकरण, राजकीय हिंसाचार आणि भ्रष्टाचार होत आहे. ज्या बंगालमध्ये एकेकाळी रवींद्र संगीत ऐकू येत होते, ते आज बॉम्बस्फोटांनी गुंजत आहे. संपूर्ण देशातून गरिबी हटवली जात आहे, पण बंगालमध्ये तसे होताना दिसत नाही. बंगालमध्ये भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे, असे म्हणत अमित शाह यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
२०२६ मध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा दावा
अमित शाह म्हणाले की, "२०२६ च्या निवडणुकीत बंगालमध्ये भाजपचे सरकार दोन तृतीयांश बहुमताने स्थापन होईल. पण त्याआधी २०२४ च्या निवडणुका येत आहेत. २०१९ मध्ये तुम्ही १८ जागा जिंकून भाजपला दिल्या होत्या. पण, मी तुम्हाला २०२४ मध्ये इतक्या जागा देण्याची विनंती करायला आलो आहे की, मोदींना शपथ घेतल्यानंतर म्हणावे लागेल की, मी बंगालमुळे पंतप्रधान झालो आहे."