कानजी स्वामींचा माझ्यावर मोठा प्रभाव: अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 03:52 PM2024-01-24T15:52:16+5:302024-01-24T15:53:17+5:30
Amit Shah Attend Pratishtha Ceremony: श्री आदिनाथ दिगंबर जिनबिंब पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव सोहळ्याला अमित शाह यांनी आवर्जून हजेरी लावली आणि उपस्थितांना संबोधित केले.
Amit Shah Attend Pratishtha Ceremony: गुजरातमधील सोनगड येथे श्री आदिनाथ दिगंबर जिनबिंब पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव सुरू आहे. दिव्य आणि भव्य सोहळ्याची सांगता २६ जानेवारी रोजी महाअभिषेकाने होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी आवर्जून उपस्थिती लावली. कानजी स्वामी यांच्या विचारांचा आणि साहित्याचा मोठा प्रभाव माझ्या जीवनावर आहे. केवळ जैन धर्मीय समुदाय नाही, तर अन्य समाजाच्या लोकांना महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले, असे गौरवोद्गार अमित शाह यांनी काढले.
श्री दिगंबर जैन स्वाध्याय मंदिर ट्रस्ट, सोनगड आयोजित या सोहळ्याला अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी, सुधीरभाई मेहता उपस्थित होते. या संपूर्ण महोत्सवाच्या आयोजनात सिंहाचा वाटा उचलणारे निमंत्रक नेमिषभाई शाह व्यासपीठावर उपस्थित होते. अनेक मान्यवरांनी यावेळी विशेष हजेरी लावली. आपल्या संबोधनात अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५५० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर प्रतीक्षेत असलेल्या राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा केली. पवित्र सोनगड धाममध्ये कानजी स्वामींनी केवळ जैनच नव्हे तर इतर समाजातील लोकांच्या जीवनात आनंद पसरवला. जीवनात अनेक गोष्टी साध्य करण्याचा मार्ग शोधूनही जर माणसाला मोक्षप्राप्तीचा मार्ग सापडला नाही, तर जीवनाच्या शेवटी सर्वकाही अपूर्ण आणि अपुरे वाटेल. प्रत्येकाला मोक्ष मिळू शकत नाही, परंतु तो मिळवण्याच्या मार्गाचे ज्ञान आणि त्यावर चालण्याचा प्रयत्न जीवनासाठी फायदेशीर ठरू शकेल, असे अमित शाह यांनी नमूद केले.
कानजी स्वामींचा माझ्यावर मोठा प्रभाव
पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवात बोलताना अमित शाह पुढे म्हणाले की, खरेतर ही बाब मी सांगणार नव्हतो. परंतु, कानजी स्वामींचा माझ्यावर मोठा प्रभाव आहे. या कार्यक्रमाला आलो म्हणून असे म्हणतोय, असे अनेकांना वाटत असेल. मात्र, हे खरे आहे. कानजी स्वामी यांचे साहित्य वाचले आहे. त्याचा माझ्या कार्यपद्धतीत मला लाभ झाला. या संपूर्ण परिसरातील अनेकांना कानजी स्वामींच्या उपदेशाचा, आचरणाचा आणि ज्ञानाचा लाभ मिळाला, असेही अमित शाह यांनी सांगितले. तसेच सिद्ध पुरुष कांजी स्वामींनी आपल्या तपश्चर्येने ही पवित्र भूमी परिपूर्ण केली आहे आणि त्यांचा संदेश सदैव जिवंत राहील, असेही ते म्हणाले. आगामी काळात सोनगड हे गुजरातमधील अध्यात्मिक केंद्रांमध्ये खूप महत्त्वाचे स्थान बनेल, असा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला.
दरम्यान, पंचकल्याणक विधींमध्ये गर्भ कल्याणक, जन्म कल्याणक आणि दीक्षा कल्याणक हे तीन विधी पूर्ण झाले असून, आता ज्ञानकल्याणक आणि मोक्ष कल्याणक विधी होणार आहेत. पंचकल्याणक महोत्सव हा प्रत्येक जीवाच्या जीवनातील पाच टप्प्यांच्या प्रवासाची समज देणारा आहे. गुरू भेटेपर्यंत जन्मानंतरचे जीवन कसे जगावे आणि गुरू मिळाल्यावर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली दीक्षा घेण्याचा मार्ग कसा मिळवावा, हे जन्म कल्याणक सांगते. दीक्षा कल्याणक हे स्वतःचे आणि इतरांचे जीवन कसे उद्धारावे, याबाबत सांगते, असे सांगताना धार्मिक विधींच्या संपूर्ण प्रक्रियेचे सार समजून घेण्याचा प्रयत्न करा, तरच ते जीवनाच्या कल्याणाच्या मार्गावर पुढे जाण्यास सक्षम होतील, असे आवाहन अमित शाह यांनी केले.