केंद्रीय मंत्री अमित शाह कोरोनामुक्त झाल्याबाबत संभ्रम; मनोज तिवारींनी ट्विट केलं डिलीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 14:11 IST2020-08-09T13:35:30+5:302020-08-09T14:11:31+5:30
अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर देशभरातून तब्येत ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात येत होती.

केंद्रीय मंत्री अमित शाह कोरोनामुक्त झाल्याबाबत संभ्रम; मनोज तिवारींनी ट्विट केलं डिलीट
नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमित शहा यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली होती. अमित शहा कोरोनामुक्त झाल्याचे भाजपा नेते मनोज तिवारी यांनी ट्विट करत याची माहिती दिली होती. पण काही वेळातच मनोज तिवारींनी ट्विट डिलीट केलं आहे. कोरोनाची काही प्राथमिक लक्षणं दिसल्यानंतर शहांनी टेस्ट केली होती, त्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. अमित शहा यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची चाचणी करण्याचे आवाहन केले होते. अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर देशभरातून तब्येत ठीक व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात येत होती.
"रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून माझी तब्येत ठीक आहे. डॉक्टर्सच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील काही काळात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी तात्काळ स्वत:ला आयसोलेट करून कोरोना टेस्ट करावी," असं आवाहन अमित शहा यांनी केलं होतं.
दरम्यान, देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना, रविवारी (2 जुलै) भाजपच्या पाच मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर उत्तर प्रदेशातील कॅबिनेट मंत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये अमित शहांसह कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, भाजपचे यूपी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव आणि उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री महेंद्र सिंह यांचा समावेश आहे.