हा केवळ अपघात नाही, मला ठार मारण्याचा प्रयत्न- अनंत कुमार हेगडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 08:38 AM2018-04-18T08:38:52+5:302018-04-18T08:38:52+5:30
ट्रक चालकाची चौकशी सुरू
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला आहे. कर्नाटकमधील हलगेरीमध्ये ही घटना घडली आहे. या अपघातात एकजण जखमी झाला आहे. 'हा अपघात नसून घातपात होता', अशी शंका हेगडे यांनी व्यक्त केली आहे. मला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला. या अपघातानंतर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतलं. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 'ट्रक चालकानं जाणूनबुजून माझ्या गाडीला धडक देण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रकची धडक दुसऱ्या गाडीला बसली', असा दावा हेगडे यांनी केला. मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. माझ्या गाडीचा वेग जास्त असल्यानं मी बचावलो, असं हेगडे यांनी सांगितलं.
#Karnataka: Union Minister Anant Kumar Hegde's escort vehicle was hit by a truck in Halageri. No casualties reported. Hegde alleged that truck tried to hit his car but was unsuccessful in doing so. The driver has been arrested. Investigation underway. pic.twitter.com/0JdJpYeJ3O
— ANI (@ANI) April 17, 2018
अपघातात हेगडे यांच्या एका कर्मचाऱ्याला गंभीर इजा झाली आहे. त्याच्या खांद्याला फ्रॅक्चर झाल्याची माहिती हेगडे यांनी दिली. अपघातानंतर लोकांनी ट्रक चालकाला पकडलं. त्याचं नाव नासिर असं आहे. अपघातावेळी नासिर मद्यधुंद अवस्थेत नव्हता. हेगडे यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
I suspect serious attempt on my life looking at the incident as it doesn't make an accident. The driver has purposefully tried hitting our vehicle and then hit our escort vehicle which is quiet evident in this video. pic.twitter.com/zAZjGwIWqq
— Anantkumar Hegde (@AnantkumarH) April 17, 2018
या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेऊन ट्रक चालकाची सखोल चौकशी करावी, असं आवाहन त्यांनी पोलिसांना केलं आहे. यामागे एखादं मोठं कारस्थान असावं, अशी शंका हेगडे यांनी व्यक्त केली आहे. पोलीस लवकरच या कारस्थानाचा पर्दाफाश करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.