गुजरात-हिमाचल प्रदेशमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? भाजपात मंथन सुरू, आज नावांची घोषणा होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 07:47 AM2017-12-22T07:47:30+5:302017-12-22T13:07:12+5:30
गुजरात व हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर मुख्यमंत्री निवडीसंदर्भात भाजपामध्ये मंथन सुरू आहे.
नवी दिल्ली - गुजरात व हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर मुख्यमंत्री निवडीसंदर्भात भाजपामध्ये मंथन सुरू आहे. गुरुवारीदेखील (21 डिसेंबर) यावरुन भाजपामध्ये मॅरेथॉन बैठका सुरू होत्या. शुक्रवारी (22 डिसेंबर) दोन्ही राज्यांतील मुख्यमंत्रीपदासाठी निवडण्यात आलेल्या व्यक्तीच्या नावाची घोषणा करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही राज्यांमध्ये शुक्रवारी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. शुक्रवारी गांधीनगर येथील विजयी आमदारांची बैठक होणार आहे, यामध्ये मुख्यमंत्री निवडण्यात येणार आहे. या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, सरोज पांडे, भूपेंद्र यादव व व्ही. सतीश सहभागी होणार आहेत. दुपारी 3.30 वाजता गांधीनगरमधील गुजरात भाजपा मुख्यालयात विधिमंडळाची बैठक होणार आहे.
गुजरातमध्ये मुख्यंत्रीपदासाठी नव्या व्यक्तीच्या नावाची चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासहीत अन्य लोकांसोबत बैठक केली. तर दुसरीकडे हिमाचलमध्ये नवीन मुख्यमंत्र्यांसंदर्भात शिमलामध्ये भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. यादरम्यान, जयराम ठाकूर यांच्या समर्थकांनी नारेबाजी करताना पाहायला मिळाले. तर दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री प्रेम कुमार धूमल यांचे समर्थक एकवटले होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, 25 डिसेंबर रोजी गुजरातचे नवे मुख्यमंत्री शपथ घेऊ शकतात. 25 डिसेंबरला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस असतो. तसंच 2012 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजी चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुजरातची निवडणूक भाजपा, मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि उप-मुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या नेतृत्त्वात लढेल, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीसाठी पक्षाचा प्रमुख चेहरा असतील, असं जाहीर केलं होतं. सूत्रांच्या मते, यावेळी भाजपाला मिळालेल्या विजयात कमी अंतर असल्या कारणाने पक्ष नेतृत्व मुख्यमंत्री बदलण्याच्या मुद्द्यावर विचार करू शकतात.
भाजपाने यावेळी गुजरातमध्ये माझ्या चेहऱ्याबरोबर निवडणुक लढविली. पण मुख्यमंत्रिपदाबद्दलचा अंतिम निर्णय संसदीय बोर्डाकडूनच केला जाईल, असं गुजरातचे मुख्यमंत्री कोण होणार ? या पत्रकारांच्या प्रश्नावर विजय रूपाणी यांनी उत्तर दिलं आहे. गुजरात विधानसभेच्या 182 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला 99 जागा मिळाल्या तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या.
गुजरातचे मुख्य सचिव जे एन सिंह यांनी मंगळवारी अहमदाबादमधील सरदार पटेल स्टेडिअमचं निरिक्षण केलं. या स्टेडिअमवर शपथविधीचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा सोहळा येथे होऊ शकतो, म्हणून सरदार पटेल स्टेडिअमचं निरिक्षण करत असल्याचं, जे एन सिंह यांनी म्हंटलं. टीमकडून महात्मा मंदिर आणि साबरमती रिव्हरफ्रंटसारख्या ठिकाणांचीही पाहणी केली जाईल, असं ते म्हणाले.
भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि भाजपाशासित राज्याचे मुख्यमंत्री शपथविधीच्या सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता आहे.