पंतप्रधान मोदींचे 'खास' मंत्री भर गर्दीत मेट्रोने फिरले, कुणालाच नाही कळले!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 12:01 PM2019-09-05T12:01:14+5:302019-09-05T12:03:02+5:30
राजकारणी किंवा नेता म्हटल्यानंतर जी आकृती डोळ्यापुढे येते, त्यापेक्षा वेगळाच पेहराव.
सत्तेच्या खुर्चीचं माहात्म्य वेगळं सांगायची गरज नाही. त्या खुर्चीवर बसणाऱ्या बहुतांश व्यक्तींचे पाय जमिनीवर टिकत नाहीत, असा अनुभव आहे. या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीला आपल्याभोवती एक वलय निर्माण झाल्यासारखं वाटतं आणि ती हवेत तरंगू लागते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील एका प्रमुख मंत्र्यानं, मोदींच्या मर्जीतील नेत्यानं या 'परंपरे'ला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. या मंत्री महोदयांनी दिल्ली मेट्रोतून एखाद्या सामान्य प्रवाशाप्रमाणे, उभं राहून प्रवास केला. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत ना सुरक्षेचं कडं होतं, ना कुठली शाही व्यवस्था. त्यामुळे ते केंद्रीय मंत्री असल्याची कानोकान खबरही सहप्रवाशांना झाली नाही.
३ सप्टेंबर. रात्री नऊ-साडेनऊची वेळ. अनेक प्रवाशांसोबत 'ते' दिल्ली मेट्रोच्या डब्यात शिरले. तुफान गर्दी नव्हती, पण बसायला जागाही नव्हती. राजकारणी किंवा नेता म्हटल्यानंतर जी आकृती डोळ्यापुढे येते, त्यापेक्षा वेगळाच पेहराव. मेट्रोमधील एका पोलला धरून 'ते' उभे राहिले. अधे-मधे मोबाईल पाहत होते. दिल्ली ते फरिदाबाद आणि परतीच्या मार्गावर इंदिरा गांधी विमानतळापर्यंतचा प्रवास 'त्यांना' उभ्यानेच करावा लागला. परंतु, चेहऱ्यावर कुठेच त्रासिक भाव नव्हता.
मंत्री किंवा राजकीय नेते काही वेळा ट्रेनने, मेट्रोने प्रवास करतात. परंतु, त्यांचाभोवतीच्या गर्दीने रोजच्या प्रवाशांना त्रासच अधिक होतो. इथे मात्र 'त्यांचं' असणं कुणाला कळलंसुद्धा नाही. हे 'ते' म्हणजे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत.
मोदी सरकार-१ मध्ये गजेंद्रसिंह शेखावत हे केंद्रीय कृषिराज्यमंत्री होते. यावेळी नरेंद्र मोदींनी त्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती दिली आणि त्यांच्याकडे अत्यंत जिव्हाळ्याच्या जलशक्ती मंत्रालयाचा कार्यभार सोपवला. राजस्थानमधील एका छोट्या गावातून आलेले गजेंद्रसिंह शेखावत हे उच्चविद्याविभूषित मंत्री आहेतच, पण साधी राहणी आणि नम्रता हे त्यांचे गुणही विशेष लक्षवेधी आहेत.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत जोधपूर मतदारसंघात त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे चिरंजीव वैभव गेहलोत यांचा २ लाख ७४ हजार मतांनी पराभव केला होता.
तुम्ही मेट्रोत कसे?
मला एका खासगी कार्यक्रमासाठी फरिदाबादला जायचं होतं. मनात आलं मी मेट्रो पकडली. त्यात एवढं आश्चर्य वाटायचं काहीच कारण नाही. मेट्रोने प्रवास करण्याची एक वेगळीच मजा असते आणि मी मंत्री आहे म्हणून मेट्रोने जाऊ नये असं नाही ना?, अशी प्रांजळ प्रतिक्रिया गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिली आहे.