कृषिक्षेत्राशी संबंधित तीन विधेयकांच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री हरसिमरत बादल यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 03:26 AM2020-09-18T03:26:01+5:302020-09-18T06:29:27+5:30
हरसिमरत कौर बादल या मोदी सरकारमध्ये शिरोमणी अकाली दलाच्या एकमेव प्रतिनिधी आहेत. हा पक्ष भाजपचा सर्वात जुना मित्रपक्ष आहे.
नवी दिल्ली : कृषिक्षेत्राशी संबंधित तीन विधेयकांच्या निषेधार्थ केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे राजीनामा सुपूर्द केला, असे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांचे प्रधान सचिव हरचरण बैन्स यांनी सांगितले.
कृषी क्षेत्राशी संबंधित विधेयकांच्या निषेधार्थ हरसिमरत कौर बादल मोदी सरकारचा राजीनामा देतील, अशी घोषणा शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी गुरुवारी लोकसभेत केल्यानंतर लागलीच हरसिमरत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा
दिला. कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सुविधा) आणि शेतकरी (सशक्तीकरण व संरक्षण) किंमत हमी करार व कृषीसेवा या दोन विधेयकावरील चर्चेदरम्यान सुखबीर सिंग बादल यांनी या विधेयकांना कडाडून विरोध करताना सांगितले की, शिरोमणी अकाली दल शेतकऱ्यांचा पक्ष आहे. कृषीसंबंधित या प्रस्तावित कायद्याने कृषिक्षेत्रासाठी पंजाबमधील सलग सरकारने ५० वर्षे केलेल्या कठोर मेहनतीवर पाणी फेरले जाईल.
भाजपचा जुना मित्रपक्ष
धान्योत्पादनात भारत स्वावलंबी करण्यात पंजाबचे मोठे योगदान आहे. मी घोषणा करतो की, हरसिमरत कौर बादल केंद्र सरकारचा राजीनामा देतील. हरसिमरत कौर बादल या मोदी सरकारमध्ये शिरोमणी अकाली दलाच्या एकमेव प्रतिनिधी आहेत. हा पक्ष भाजपचा सर्वात जुना मित्रपक्ष आहे.