नुसती मेहनत नको, माल्ल्यासारखे स्मार्ट बना; मोदींच्या मंत्र्याचा तरुणांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 12:52 PM2018-07-14T12:52:55+5:302018-07-14T12:54:32+5:30
हैदराबाद येथील पहिल्या राष्ट्रीय अनुसूचित जमाती उद्योजक संमेलनाला संबोधित करताना त्यांनी फरार झालेल्या माल्ल्याचे उदाहरण दिले
हैदराबाद: भारताला कोट्यावधीचा चुना लावून फरार झालेल्या मद्यसम्राट विजय माल्ल्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत प्रेरणा घेण्याचा अजब सल्ला केंद्रीय आदिवासी विकास मंत्री आणि भाजपाचे नेते जुएल ओराम यांनी आदिवासी समाजातील तरुणांना दिला होता. नुसती मेहनत करू नका, मल्ल्यासारखे स्मार्ट बना असा सल्ला ओराम यांनी दिला होता. त्यांच्या या अजब सल्ल्याची चर्चा रंगल्यानंतर ओराम यांनी आता सारवासारव करत मी चुकून विजय माल्ल्याचं नाव घेतलं. मी त्याचं नाव घ्यायला नको होतं माझी चूक झाली असं म्हटलं आहे.
I accidentally took Vijay Mallya's name. I should have taken someone else's name. I should not have taken his name, it was my mistake: Union Minister Jual Oram on him reportedly describing Vijay Mallya as 'smart' in an event in Hyderabad yesterday pic.twitter.com/A6LLlNZicE
— ANI (@ANI) July 14, 2018
हैदराबाद येथील पहिल्या राष्ट्रीय अनुसूचित जमाती उद्योजक संमेलनाला संबोधित करताना त्यांनी फरार झालेल्या माल्ल्याचे एक उदाहरण दिले. ‘माल्ल्याने कितीही वाईट कामे केलेली असली, तरी त्या आधी तो एक यशस्वी व्यावसायिक होता. त्याच्या या यशापासून प्रेरणा घेण्यासारखी आहे. विजय माल्ल्या हा एक कुशल आणि स्मार्ट माणूस आहे. त्याने आपल्याकडे बुद्धिमान माणसांना कामावर ठेवलं आणि नंतर बँका, सरकार आणि राजकारण्यांवर आपला प्रभाव पाडला. तुम्हाला हे सगळं करण्यापासून कोणी रोखलं आहे?’ असं ओराम म्हणाले.
ओराम यांनी आदिवासींना सल्ला देताना आदिवासी असल्याचे काही फायदेही सांगितले. शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात आदिवासींना आरक्षणाची सोय आहे. त्याचा फायदा घेऊन त्यांनी चांगली कामगिरी करावी, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. मात्र काही वेळानंतर आपण घातलेला घोळ त्यांच्या लक्षात आला आणि या चुकीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.