...अन् केंद्रीय मंत्री सिंधियांनी स्वत:चा मास्क माजी मंत्र्याला घातला; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 02:48 PM2021-09-24T14:48:24+5:302021-09-24T14:51:34+5:30
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी भाजप नेत्याला घातला वापरलेला मास्क
भोपाळ: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. हा धोका टाळण्यासाठी लसीकरणासोबतच कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. सोशल डिस्टन्सिंगसोबतच मास्कचा वापर करण्याची आवश्यकता आहे. मात्र काही जण मास्क वापरण्यास टाळाटाळ करतात. यात सर्वसामान्यांसह राजकारण्यांचादेखील समावेश आहे.
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ते स्वत:चा मास्क काढून माजी मंत्री अनुप मिश्रा यांना घालताना दिसत आहेत. मिश्रा हे माजी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे भाचे आहेत. मिश्रा विनामास्क दिसताच सिंधिया यांनी त्यांना स्वत:चा मास्क घातला. सिंधिया यांच्या बेजबाबदार वर्तनावर विरोधकांनी टीका केली आहे.
सिंधिया जी महाराजा हैं, कुछ भी दान कर सकते हैं, अपना इस्तेमाल किया हुआ मास्क ही क्यों न हो।pic.twitter.com/z8EWjQDd9G
— Utkarsh Singh (@UtkarshSingh_) September 23, 2021
गुरुवारी सकाळी ज्योतिरादित्य सिंधिया ग्वाल्हेरमधल्या मांढरे माता मंदिरात गेले होते. मंदिरात प्रवेश करताना सिंधिया यांनी अनुप मिश्रा यांना विनामास्क पाहिलं. सिंधिया यांनी स्वत:चा मास्क उतरवला आणि तोच मिश्रा यांच्या तोंडावर चढवला. त्यानंतर सिंधिया यांनी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं. सिंधिया यांच्या कृतीचा काँग्रेसनं समाचार घेतला. भाजप नेत्यांच्या रॅलींवर कोरोना संकटात कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत आणि त्यांचे नेते सुरक्षेच्या नावाखाली वापरलेले मास्क वाटत आहेत, अशा शब्दांत काँग्रेसनं सिंधियांवर निशाणा साधला.