“देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 17:28 IST2023-12-09T17:25:04+5:302023-12-09T17:28:40+5:30
Jyotiraditya Scindia: यापूर्वी देशात नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव होता, सन २०१४ मध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला, असे सांगत ज्योतिरादित्य शिंदे यांनी आगामी योजनांबाबत माहिती दिली.

“देशात २०३० पर्यंत २०० एअरपोर्ट, २०४७ पर्यंत ४५०० ‘वंदे भारत’ असतील”: ज्योतिरादित्य शिंदे
Jyotiraditya Scindia Reaction On Vande Bharat Express Train: देशभरात वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची क्रेझ वाढताना दिसत आहे. केवळ क्रेझ वाढत नसून, वंदे भारत ट्रेनला मिळणारा प्रतिसादही वाढताना पाहायला मिळत आहे. यातच अनेक नव्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन प्रस्तावित असून, देशाच्या अनेक भागातून वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी केली जात आहे. यातच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
केंद्र सरकार पायाभूत सुविधांच्या आघाडीवर सातत्याने लक्ष देत आहे. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले की, बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा येत्या तीन वर्षांत सुरू होईल. तर, २०४७ पर्यंत देशातील वंदे भारत ट्रेनची संख्या ४५०० पर्यंत वाढवली जाईल, अशी योजना असल्याची माहिती ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली.
२०३० पर्यंत २०० हून अधिक एअरपोर्ट देशात असतील
सन २०३० पर्यंत देशात सुमारे २०० एअरपोर्ट असतील. नवी मुंबईतील एअरपोर्ट पुढील वर्षीच्या अखेरीस सुरू होईल. तसेच अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या मर्यदा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचे बांधकाम या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. जानेवारीत श्रीराम नगरीत येणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी अयोध्येचे विमानतळ सज्ज असेल, अशी अपेक्षा ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केली. अलीकडेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत अयोध्या एअरपोर्टच्या कामाची पाहणी केली. या महिन्याच्या अखेरीस ते पूर्णपणे तयार होईल. दररोज या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या एअरपोर्टचे लोकार्पण करतील, अशी माहितीही शिंदे यांनी दिली.
दरम्यान, यापूर्वी देशात नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव होता, सन २०१४ मध्ये एक नवीन अध्याय सुरू झाला. देशात १० लाख कोटींचे प्रकल्प सुरू आहेत. भारतीय रेल्वे जगातील सर्वात वेगाने वाढणारी व्यवस्था आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वाधिक दुर्लक्षित भाग असलेला जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले आहे, असेही शिंदे यांनी सांगितले.