#MeToo: लवकरच कायदेतज्ज्ञांच्या समितीची स्थापना; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 04:06 PM2018-10-12T16:06:41+5:302018-10-12T16:35:56+5:30
महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधींची माहिती
नवी दिल्ली: मीटू चळवळीतून पुढे आलेल्या घटनांच्या तपासणीसाठी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीत कायदेतज्ज्ञांचा समावेश असेल. #MeToo च्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक महिलेवर माझा विश्वास आहे, असं महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी म्हणाल्या. या सर्व महिलांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी लवकरच एक समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मीटू चळवळीनं जोर धरला आहे. या माध्यमातून अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचारांना वाचा फोडली आहे. यामध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आणि पत्रकारांचा समावेश आहे. या तक्रारींची प्रथमच सरकारनं दखल घेतली आहे. या सर्व प्रकरणांच्या चौकशीसाठी सरकार चार सदस्यांची नेमणूक करणार आहे. यामध्ये चार निवृत्त न्यायमूर्तींचा समावेश असेल. या समितीकडून मीटू चळवळीच्या माध्यमातून पुढे आलेल्या तक्रारींवर सुनावणी होईल.
The Ministry will be setting up a committee of senior judicial & legal persons as members to examine all issues emanating from the #MeTooIndia movement: Ministry of Women & Child Development pic.twitter.com/5uBF0LVukc
— ANI (@ANI) October 12, 2018
मी टूच्या माध्यमातून पुढे आलेल्या प्रत्येक महिलेचं दु:ख आणि त्यांची व्यथा मी समजू शकते, असं महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी म्हणाल्या. 'या तक्रारींच्या चौकशीसाठी चार निवृत्त न्यायाधीशांची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच ही समिती स्थापन होईल आणि या सर्व तक्रारींवर सुनावणी होईल', अशी माहिती त्यांनी दिली. अभिनेत्री तनुश्री दत्तानं अभिनेते नाना पाटेकर यांच्या विरोधात गैरवर्तनाची तक्रार केल्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेले अनुभव मोकळेपणानं सोशल मीडियावर मांडले. यासोबतच अनेक महिला पत्रकारांनीदेखील त्यांना आलेले कटू अनुभव या माध्यमातून जगासमोर आणले आहेत.
#WATCH: Minister for Women & Child Development Maneka Gandhi explains about the committee which will be set up to examine all issues emanating from the #MeTooIndia movement. pic.twitter.com/Uo9qEl1wIb
— ANI (@ANI) October 12, 2018