"दिल्लीत येण्याआधी खूप विचार करतो कारण..."; गडकरींची राजधानीपासून दूर राहण्याला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 01:24 PM2024-12-04T13:24:07+5:302024-12-04T13:33:10+5:30

दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाचे विधान केलं.

Union Minister Nitin Gadkari on Tuesday expressed concern over Delhi severe air pollution | "दिल्लीत येण्याआधी खूप विचार करतो कारण..."; गडकरींची राजधानीपासून दूर राहण्याला पसंती

"दिल्लीत येण्याआधी खूप विचार करतो कारण..."; गडकरींची राजधानीपासून दूर राहण्याला पसंती

Nitin Gadkari Delhi Pollution: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली. नितीन गडकरींनी एका कार्यक्रमादरम्यान दिल्लीत येणे आपल्याला अजिबात आवडत नाही कारण येथील प्रदूषणाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो असल्याचे कबुल केलं आहे. दिल्ली हे असे शहर आहे जिथे प्रदूषणामुळे मला वारंवार संसर्ग होतो. प्रत्येक वेळी मी दिल्लीत येतो तेव्हा मी विचार करतो की इथे यावं की नाही, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. दिल्लीतल्या प्रदूषणाच्या समस्येवरुन सुप्रीम कोर्टानेही ताशेरे ओढलेले असताना आता केंद्रीय मंत्र्यांनीही याबाबत गंभीर चिंता व्यक्त केलीय. 

दिल्लीत वायू प्रदूषण ही बऱ्याच वर्षांपासून गंभीर समस्या आहे. मात्र गेल्या काही काळापासून ती अधिक धोकादायक बनत चालली आहे.  काही दिवसांपूर्वीथ दिल्लीकरांना एअर क्वालिटी इंडेक्समध्ये थोडासा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी, हवेचा गुणवत्ता निर्देशांक २७४ वर नोंदवली गेली, जी मध्यम श्रेणीमध्ये येते. मात्र, नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरची सुरुवात तुलनेने चांगली झाली आहे. नोव्हेंबरमधील बहुतेक दिवस हवेची गुणवत्ता खूपच खराब राहिली, ज्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. 

अशातच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही दिल्लीतील गंभीर वायू प्रदूषणावर चिंता व्यक्त केली. प्रत्येक वेळी  "मी दोन दिवस दिल्लीत राहिलो तर मला संसर्ग होतो. प्रत्येक वेळी मी दिल्लीत आलो की, मी यावं की नाही, असा प्रश्न पडतो. इथलं प्रदूषण खूप गंभीर आहे," असं नितीन गडकरी म्हणाले. 'ऊर्जा संक्रमण आणि शाश्वत रस्ते वाहतूक' या विषयावरील कार्यक्रमात निती गडकरी बोलत होते. दिल्लीच्या तीव्र वायू प्रदूषणाचा येथील लोकांच्या जीवनावर वाईट परिणाम होतो. प्रदूषणाबाबत जनजागृतीचा अभाव अजूनही कायम असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले.

प्रदूषण कमी करण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलसारख्या जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्याचा सल्ला नितीन गडकरींनी दिला.  "भारत दरवर्षी सुमारे २२ लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करतो, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि पर्यावरणावर मोठा भार पडतो. पर्यायी इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देऊन हा खर्च कमी करता येईल. वीज, इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन, जैवइंधन यांसारख्या पर्यायी इंधनांच्या वापराला प्रोत्साहन द्यायला हवे. हे पर्याय केवळ पर्यावरणासाठीच चांगले नाहीत, तर देशाची अर्थव्यवस्था बळकट करू शकतात," असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.
 

Web Title: Union Minister Nitin Gadkari on Tuesday expressed concern over Delhi severe air pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.