"... म्हणून देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे", नितीन गडकरींकडून माजी पंतप्रधानांचे कौतुक!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 09:20 AM2022-11-09T09:20:03+5:302022-11-09T09:20:55+5:30
Nitin Gadkari : भारतातील गरीब लोकांना लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने उदार आर्थिक धोरणाची गरज आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कौतुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी केले. मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या आर्थिक सुधारणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. आर्थिक सुधारणांसाठी देश माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. तसेच, भारतातील गरीब लोकांना लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने उदार आर्थिक धोरणाची गरज आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
टॅक्स इंडिया ऑनलाइन पोर्टल अवॉर्ड (TIOL Awards 2022) कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी, मनमोहन सिंग यांनी 1991 मध्ये अर्थमंत्री म्हणून आर्थिक सुधारणा सुरू करून भारताला नवी दिशा दिली होती. यामुळे देशात उदारमतवादी अर्थव्यवस्थेची सुरुवात झाली, असे मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नितीन गडकरी पुढे म्हणाले की 'लिबरल अर्थव्यवस्थेमुळे (Liberal Economy) देशाला नवी दिशा मिळाली, त्यासाठी मनमोहन सिंग यांचा देश ऋणी आहे.'
याचबरोबर, माजी पंतप्रधान सिंग यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे 1990 च्या दशकात मी महाराष्ट्रात मंत्री असताना रस्ता बांधण्यासाठी निधी उभारता आला होता, अशी आठवण नितीन गडकरी यांनी सांगितली. नितीनगडकरी म्हणाले की, उदार आर्थिक धोरण शेतकरी आणि गरीब लोकांसाठी आहे. उदारमतवादी आर्थिक धोरण कोणत्याही देशाच्या विकासात कशी मदत करू शकते, याचे चीन हे उत्तम उदाहरण आहे. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी भारताला अधिक भांडवली खर्च गुंतवणुकीची गरज आहे, असेही ते म्हणाले.
एनएचएआय महामार्गाच्या बांधकामासाठीही सर्वसामान्यांकडून निधी गोळा करत असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच, नितीन गडकरी म्हणाले की, त्यांचे मंत्रालय 26 ग्रीन एक्स्प्रेस वे बांधत आहे आणि त्यांना निधीची कमतरता भासत नाही. त्यांच्या मते, एनएचएआयचा टोल महसूल सध्याच्या 40,000 कोटी रुपयांवरून 2024 च्या अखेरीस 1.40 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल. याशिवाय, देशातील गरीब लोकांना त्यांच्या जीवनात आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने भारताला उदार आर्थिक धोरण तयार करण्याची नितांत गरज असल्याचेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.