“भारताच्या नादी लागू नका, अन्यथा तुमची मुले अनाथ होतील”; राजीव चंद्रशेखर यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 01:27 PM2023-09-17T13:27:01+5:302023-09-17T13:27:42+5:30
Anantnag Encounter: भारताच्या नादी लागण्याची चूक करू नका. नवा भारत घाबरणारा किंवा मागे हटणारा नाही, असे राजीव चंद्रशेखर यांनी म्हटले आहे.
Anantnag Encounter: काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागमध्ये गेल्या काही दिवसांपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. येथे जंगलातील टेकड्यांमध्ये लष्कराने दहशतवाद्यांना घेरले आहे. रॉकेट लाँचर आणि इतर घातक शस्त्रांचा वापर करून केलेल्या हल्ल्यात तीन दहशतवादी मारले गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन दहशतवादी अजूनही लपून बसले आहेत. दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची कारवाई सुरूच आहे. यातच केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत सज्जड दम दिला आहे.
भारतातील जी-२० शिखर परिषदेच्या यशानंतर पाकिस्तानी लष्कराच्या सूचनेनुसार काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांची योजना आखण्यात आली होती. येथे भारतीय लष्कर गुप्तचर माहितीच्या आधारे आधीच सतर्क होते. या आठवडाभरात दहशतवाद्यांविरोधात काश्मीर खोऱ्यात पाच मोठ्या कारवाया करण्यात आल्या, अशी माहिती देण्यात आली. यानंतर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत इशारा दिल्याचे म्हटले जात आहे.
भारताच्या नादी लागू नका, अन्यथा तुमची मुले अनाथ होतील
भारताचे शत्रू आहेत. या शत्रूंना रोखणे हेच भारताचे ध्येय आहे. पण हे त्यांना कळायला हवे. भारतीय सैन्य आता आधुनिक उच्च तंत्रज्ञान आणि प्राणघातक मशीन्सयुक्त आहे. त्यामुळे भारताच्या नादाला लागायची कोणतीही चूक करू नका. अशा टाळण्यातच शहाणपण असेल. हा न्यू इंडिया आहे. हा भारत घाबरणारा नाही. भारत मागे हटणारा नाही. भारताने युद्ध पाहिली आहेत. मात्र, भारताला युद्ध नको आहे. पण, तरीही तुम्ही भारताच्या नादी लागत असाल तर तुमची मुले अनाथ होतील, या शब्दांत राजीव चंद्रशेखर यांनी एक्सवर इशारा दिला. तसेच या ट्विटमध्ये न्यू इंडियाचा हॅशटॅगही वापरला आहे.
दरम्यान, अनंतनागमध्ये दहशतवादी असल्याची ठोस माहिती मिळाल्यानंतर लष्कराने शोधमोहीम सुरू केली. यावेळी झालेल्या चकमकीत १९ राष्ट्रीय रायफल्सचे कर्नल मनप्रीत सिंह, मेजर आशिष धोनचक आणि काश्मीर पोलिसांचे डीएसपी हुमायून मुजम्मील भट्ट हे शहीद झाले. या कारवाईदरम्यान आणखी एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.