केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, लँडिंगदरम्यान पंख्याचे पाते तारेत अडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2020 08:52 PM2020-10-17T20:52:28+5:302020-10-17T21:01:11+5:30
Ravi Shankar Prasad News : रविशंकर प्रसाद हे बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे प्रचार अभियान आटोपून पाटणा येथे परतत असताना हा अपघात झाला.
पाटणा - केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद आज बिहारमध्ये एका हेलिकॉप्टर अपघातात बालंबाल बचावले. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अभियानादरम्यान, रविशंकर प्रसाद यांच्या हेलकॉप्टरच्या पंख्याची पाती तारेत अडकली. त्यामुळे हेलिकॉप्टरची पाती तुटली. हा अपघात घडला तेव्हा रविशंकर प्रसाद यांच्यासोबत हेलिकॉप्टरमधून मंगल पांडेय आणि संझय झा हे प्रवास करत होते.
रविशंकर प्रसाद हे बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे प्रचार अभियान आटोपून पाटणा येथे परतत असताना हा अपघात झाला. पाटणा विमानतळावर हेलिकॉप्टर उतरत असताना रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरच्या पंख्याची पाती बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ओव्हरहेड वायरला अडकली.
या दुर्घटनेत हेलिकॉप्टरचा पंखा तुटला. मात्र सुदैवाने या अपघातात रविशंकर प्रसाद यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. तसेच त्यांच्यासोबत प्रवास करत असलेले मंगल पांडेय आणि संझय झा हेसुद्धा सुरक्षित आहेत. दरम्यान, आपण पूर्णपणे सुखरूप असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी या अपघातानंतर सांगितले.
I went to Jhanjharpur for an election campaign. Rotor blade of the helicopter that was used during travel was damaged a little after I deboarded it. I am absolutely fine: Union Minister Ravi Shankar Prasad #Biharpic.twitter.com/EGZTgrDOlI
— ANI (@ANI) October 17, 2020
बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.