केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 09:25 PM2020-09-23T21:25:32+5:302020-09-23T21:25:38+5:30
सुरेश अंगडी यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे आज निधन झालं आहे. बुधवारी वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. सुरेश अंगडी यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या वृत्तामुळे त्यांचे कुटुंब आणि मोदी मंत्रिमंडळात शोककळा पसरली आहे. बेळगाव मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर भाजपातर्फे ते निवडून गेले होते. मोदी यांच्या दुसऱ्या सरकारमध्ये ते रेल्वे राज्यमंत्री आहेत.
अनेक राजकारण्यांनी अंगडींच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. केंद्रीय मंत्री यांच्या निधनाबद्दल कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी दु: ख व्यक्त केले. ते म्हणाले, "अंगडीजी नेहमी हसत होते. मला ही दु:खद बातमी ऐकून फारच दुःख झाले", असे त्यांनी ट्विट केले. तर भाजपा नेते संबित पात्रा यांनी त्यांच्या निधनाबद्दल ट्विट करत दुःख व्यक्त केले.
Suresh Angadi was a dedicated MP and effective minister, admired across the spectrum. His demise is saddening. My thoughts are with his family and friends in this sad hour, tweets Prime Minister Narendra Modi pic.twitter.com/55obcBwdrU
— ANI (@ANI) September 23, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत दुःख व्यक्त केलं आहे. अंगडी यांनी पक्षाला कर्नाटकात मजबूत केले. कामासाठी स्वतःला वाहून घेतलेले खासदार आणि ते प्रभावी मंत्री होते. त्यांचंही कामही कौतुकास्पद होते. त्यांचा मित्र परिवार आणि कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे, ओम शांती, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलं आहे.