मोबाईल नेटवर्कसाठी चक्क झाडावर चढले केंद्रीय मंत्री
By admin | Published: June 5, 2017 02:26 PM2017-06-05T14:26:48+5:302017-06-05T14:26:48+5:30
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांना मोबाईल नेटवर्कसाठी चक्क झाडावर चढावं लागलं
Next
>ऑनलाइन लोकमत
बिकानेर, दि. 5 - सध्या जिकडे तिकडे डिजीटल भारतासंबंधी चर्चा आहे, मात्र सत्य परिस्थिती वेगळी आहे. शहरांमध्ये विकास होत असताना, अनेक गावांमध्ये अद्याप साधं मोबाईलचं नेटवर्कही पोहोचलेलं नाही. केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनीच आपल्या सरकारला आरसा दाखवत सत्य परिस्थितीची जाणीव करुन दिली आहे. मोबाईल नेटवर्क मिळवण्यासाठी खुद्द केंद्रीय मंत्र्यांनाच झाडावर चढावं लागलं.
तर झालं असं की, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल ढोलिया गावाच्या दौ-यावर आले होते. तेथील लोकांनी रुग्णालयात नर्स नसल्याची तक्रार केली होती. गावक-यांच्या तक्रारीची दखल घेत तात्काळ कारवाई करण्याच्या उद्धेशाने अर्जुनराम मेघवाल यांनी आपला मोबाईल बाहेर काढला. बिकानेरच्या मुख्य आरोग्य अधिका-याशी बातचीत करुन लगेच हा प्रश्न मार्गी लावू असं म्हणत त्यांनी मोबाईल हातात घेतला तर काय मोबाईलला नेटवर्कच नाही.
आता करायचं काय असा प्रश्न उभा राहिला. तेव्हा गावक-यांनी सांगितलं की झाडावर चढल्यावर नेटवर्क मिळू शकतं. पण मग आता झाडावर चढायचं कसं ? मग काय गावक-यांना आपली समस्या मार्गी लावायची असल्याने त्यांनी लगेच शिडीची व्यवस्था केली. शेवटी शिडीच्या सहाय्याने मंत्रीसाहेब झाडावर चढले आणि मुख्य आरोग्य अधिका-याशी संवाद साधत लवकराच लवकर रुग्णालयात नर्सची नियुक्ती करण्याचा आदेश दिला.
नेहमी आपल्या कार्यालयात बसून फाईल्स क्लिअर करणा-या मंत्रीमहोद्यांनी झाडावर चढून आदेश देण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.