महिलांना मोठा दिलासा! रात्री-अपरात्री अडचणीत असाल तर लगेचच करा 'या' नंबरवर फोन; मिळेल मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 01:13 PM2021-07-29T13:13:53+5:302021-07-29T13:15:50+5:30
Union minister for women and child development launches 24 hours helpline for women : केंद्रीय महिला व कुटुंब कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते 27 जुलै 2021 रोजी महिलासांठी 24 तास 7 दिवस सुरू असणाऱ्या राष्ट्रीय हेल्पलाईनचं उद्घाटन करण्यात आलं.
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. महिला सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आला आहे. बलात्कार, अत्याचार यासारख्या भयंकर घटना या सातत्याने समोर येत आहेत. मात्र याच दरम्यान आता एक दिलासादायक घटना समोर आली आहे. रात्री-अपरात्री अडचणीत असलेल्या महिलांना लगेचच मदत मिळणं सोपं होणार आहे. महिलांसाठी 24 तास काम करणार राष्ट्रीय हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी महिलांना तक्रार नोंदवता येणार आहे. केंद्रीय महिला व कुटुंब कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते 27 जुलै 2021 रोजी महिलासांठी 24 तास 7 दिवस सुरू असणाऱ्या राष्ट्रीय हेल्पलाईनचं उद्घाटन करण्यात आलं.
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल महिलांना दिवस-रात्र माहिती देण्याची सेवा उपलब्ध व्हावी, तसेच महिलांना त्यांच्या तक्रारी मांडता याव्यात हा या हेल्पलाईनचा मुख्य उद्देश आहे. महिलांना गरज असल्यास हेल्पलाईनमधील तज्ज्ञ सल्लाही देणार आहेत. ही हेल्पलाईन पोलीस, हॉस्पिटल्स, जिल्हा सेवा प्राधिकरण, मानसशास्रज्ञ यांच्याशी जोडण्यात येणार आहे. तसेच याच हेल्पलाईन क्रमांकाच्या माध्यमातून महिलांना सरकारी योजनांची माहितीही दिली जाणार आहे. महिलांना सुरक्षितता पुरवणं हा या हेल्पलाइनचा मुख्य उद्देश असून मंत्रालयाने राष्ट्रीय महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरू केला आहे.
अत्याचाराने पीडित महिलांना पोलीस, हॉस्पिटल, मनोविकारतज्ज्ञ अशा सगळ्या सेवा एका छताखाली उपलब्ध व्हाव्यात ही हेल्पलाईन सुरू करण्यामागची भूमिका आहे. त्यामुळे ही हेल्पलाईन 24 तास सुरू राहणार आहे. देशातील कोणतीही महिला आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल हेल्पलाईन क्रमांक 7827 170 170 वर फोन करून आपली तक्रार नोंदवू शकते. ही हेल्पलाईन 24 तास सुरू असेल. या हेल्पलाईनच्या माध्यमातून महिलांना वेळेवर माहिती आणि मदत पुरवली जाईल, असं राष्ट्रीय महिला आयोगाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या परिसरातून ही हेल्पलाईन चालवली जाणार असून तिला प्रशिक्षित विशेषज्ज्ञ मदत करणार आहेत.
18 वर्षांची किंवा त्याहून जास्त वयाची तरुणी किंवा महिला या हेल्पलाईनला फोन करून सेवा घेऊ शकते. राष्ट्रीय महिला आयोगाच्या www.ncw.nic.in या वेबसाईटच्या माध्यातूनही महिला आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. लिखित स्वरूपात आपल्यावर होणाऱ्या अत्याचारांची माहिती महिला देऊ शकतात. राष्ट्रीय महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारींची दखल घेऊन आयोग त्यावर तातडीने कारवाई करतो आणि समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. तक्रार नोंदवण्याच्या सुविधेची व्याप्ती वाढवण्यासाठी आयोगाने ही हेल्पलाईन सुरू केली आहे. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ही हेल्पलाईन विकसित केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
नात्याला काळीमा! प्रेम विवाहामुळे नाराज झालेल्या वडिलांनी मुलीच्या हत्येनंतर मृतदेह मेरठजवळील एका कालव्यात फेकून दिला...#crime#crimesnews#India#Policehttps://t.co/TzrA460YTM
— Lokmat (@MiLOKMAT) July 29, 2021