केंद्रीय मंत्र्यांमध्ये जुंपली
By admin | Published: June 10, 2016 05:33 AM2016-06-10T05:33:05+5:302016-06-10T05:33:05+5:30
मी हत्येची हाव समजू शकत नाही’, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी जनावरांना ठार मारण्याची परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून पर्यावरण मंत्रालयावर सडकून टीका केली
हरीश गुप्ता,
नवी दिल्ली- ‘मी हत्येची हाव समजू शकत नाही’, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी जनावरांना ठार मारण्याची परवानगी देण्याच्या मुद्द्यावरून पर्यावरण मंत्रालयावर सडकून टीका केली. तथापि राज्यांच्या विनंतीवरूनच अशी परवानगी दिली जाते, असे सांगत पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी जनावरांना मारण्याची परवानगी देण्याचे समर्थन केले.
बिहारमध्ये नीलगायींना ठार मारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर महिला व बाल विकासमंत्री आणि पशू अधिकार कार्यकर्त्या मनेका गांधी यांनी हे वक्तव्य केले आहे. गांधी यांनी या नीलगायींची हत्या हा आजवरचा सर्वात मोठा नरसंहार असल्याचे म्हटले आहे. गांधी यांनी पर्यावरण मंत्रालयावर टीका केल्यानंतर केंद्रामध्ये ताळमेळ नाही, असा आरोप विरोधकांनी केला. गांधी म्हणाल्या, ‘ज्या जनावरांची हत्या करण्यासाठी केंद्राची परवानगी घेणे आवश्यक आहे, अशा सर्व जनावरांची यादी राज्यांकडून मागविण्याचे काम सध्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालय करीत आहे. हे पहिल्यांदाच घडत आहे. जनावरांच्या हत्येची ही कसली हाव आहे, हे मी समजू शकले नाही.’
हे जनावरांच्या संख्येचे वैज्ञानिक व्यवस्थापन आहे आणि अपायकारक घोषित करण्यात आलेल्या जनावरांना मारण्याची परवानगी काही विशेष प्रदेश आणि ठरावीक कालावधीसाठीच दिली जाते, असे सांगून जावडेकर यांनी मात्र या पावलाचे समर्थन केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>आरोप... आणि खुलासा
केंद्र सरकारने बिहारमध्ये नीलगायी, पश्चिम बंगालमध्ये हत्ती, हिमाचल प्रदेशमध्ये माकड, गोव्यात मोर आणि महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात रानडुकरे मारण्याची परवानगी दिली. एकाही ग्रामप्रधान वा शेतकऱ्याने नीलगायींना मारण्याची परवानगी मागितली नसताना बिहारमध्ये अशी परवानगी दिली.
- मनेका गांधी, केंद्रीय मंत्री
विद्यमान कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना जनावरांचा जास्त त्रास होतो आणि त्यांचे पीक नष्ट होते, तसेच राज्य सरकार जेव्हा प्रस्ताव पाठविते तेव्हाच आम्ही जनावरांना ठार मारण्याची परवानगी देतो. राज्य सरकारच्या विशेष भागात आणि ठरावीक काळासाठीच अशी परवानगी दिली जाते. परंतु हा काही केंद्र सरकारचा कार्यक्रम नाही. कायदाच तसा आहे. - प्रकाश जावडेकर
>बिहार जावडेकरांसोबत
जावडेकर यांच्या भूमिकेला अनपेक्षितपणे बिहार सरकारने पाठिंबा दिला आहे. वन्यप्राणी शेतांमध्ये शिरून शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे प्रसंगी त्यांना मारणे आवश्यक असते, असे बिहार सरकारतर्फे सांगण्यात आले. बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यापासून काही अंतरावर असलेल्या बाढ भागात शेतीचे नुकसान करणाऱ्या 400 नीलगायींना मारण्यात आले आहे.