‘ते बायजेट नाही बजेट आहे, रिलाय नव्हे तर रिप्लाय आहे’; रामदास आठवलेंनी घेतली थरूर यांची फिरकी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 10:46 AM2022-02-12T10:46:59+5:302022-02-12T10:47:21+5:30
आठवलेंनी काढल्या थरूर यांच्या चुका, हा मजकूर इंग्रजीत लिहिताना थरूर यांनी दोनवेळा बजेट शब्दाचा उपयोग केला आहे.
नवी दिल्ली : फर्डे इंग्रजी बोलणारे व प्रसिद्ध लेखक म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांची ओळख आहे. परंतु केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास यांनी खासदार शशी थरूर यांच्या ट्विटरमधील इंग्रजीत लिहिलेल्या मजकुरात २ चुका दाखवून दिल्या आहेत. त्या ट्विटमध्ये बजेट व रिप्लाय हे शब्द चुकीचे आले आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले. सीतारामन यांचे भाषण सुरू असताना मागील बाकावर राज्यमंत्री रामदास आठवले बसलेले होते. हे छायाचित्र टॅग करून थरूर यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात थरूर यांनी लिहिले की, सीतारामन यांनी जवळपास दोन तास अर्थसंकल्पाच्या चर्चेला उत्तर दिले. अविश्वासनीय अर्थसंकल्पाने सत्तारुढ पक्षातील सदस्यांनाही धक्का बसला आहे, हे राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट होत आहे. अर्थसंकल्पातील दाव्यावर सत्तारुढ पक्षातील नेतेही विश्वास ठेवू शकत नाहीत.
हा मजकूर इंग्रजीत लिहिताना थरूर यांनी दोनवेळा बजेट शब्दाचा उपयोग केला आहे. पहिल्यांदा बजेट शब्द लिहिताना बीयूडीजीईटी ऐवजी बीवायडीजीईटी असे लिहिले आहे. हा मुद्या पकडून आठवले यांनी थरूर यांना ट्विटरवरून उत्तर दिले. प्रिय, शशी थरूरजी, कुणी अनावश्यक दावे व निवेदन करीत असल्यास चुका होतात. ते बायजेट नाही बजेट आहे. तसेच रिलाय नव्हे तर रिप्लाय आहे.
मुझको आती है हंसी...
या मिश्किल ट्विटरवादाचे पडसाद नागपुरातही उमटले. पत्रकारांनी यावर कवितेतून उत्तर देण्याची विनंती आठवले यांना केली. तेव्हा आठवले यांनीही लगेच कविता सादर केली. ते म्हणाले, जिनकी इंग्लिश मैंने ट्विटरपर देखी उनका नाम है शशी... उनका बयान देखकर मुझको आती है हंसी...