थंडीमध्ये शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा, चर्चेसाठी प्रस्ताव न मिळाल्याचा संघटनांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 05:47 AM2020-12-22T05:47:56+5:302020-12-22T05:48:28+5:30
Farmer Protests : सोमवारी शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे अडवून धरत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना प्रस्ताव पाठविल्याची चर्चा आहे, परंतु संयुक्त किसान मोर्चापर्यंत अद्याप कोणताही प्रस्ताव पोहोचला नाही. कडाक्याच्या थंडीतही कायदे मागे घ्यावेत यासाठी शेतकरी लढा देत आहेत. परंतु सरकारकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याने त्यांचा संयम तुटण्याची चिन्हे दिसत आहेत. सोमवारी शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे अडवून धरत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
‘लोकमत’शी बोलताना संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील म्हणाले की, सरकारने प्रस्ताव पाठवल्याच्या बातम्या माध्यमातूनच मिळत आहेत. परंतु आमच्यापर्यंत असा कुठलाही प्रस्ताव आला नाही. प्रस्ताव आला तर आम्ही चर्चा करू. तिन्ही कायद्यावर याआधी चर्चा झाली आहे. त्यामुळे तो विषय सोडून थेट ‘एमएसपी’वर चर्चा करू. आंदोलनाचे पडसाद देशभर उमटत आहेत.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच
नाशिक : कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देणाऱ्या शेतकरी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांनी सोमवारी नाशिकहून राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली.
साखळी उपवास आंदोलन
- गेले २६ दिवस अत्यंत संयमाने आंदोलन सुरू आहे. लाखो शेतकरी दिल्लीच्या विविध सीमेवर बसून आहेत. मात्र, थंडीचा जोरात मार बसत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. आंदोलना दरम्यान ३३ शेतकऱ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे.
सोमवारी शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे आणि अन्य काही मार्ग अडवलेत. विविध सीमेवर शेतकऱ्यांनी २४ तासांचे उपवास सुरू केले आहे. उपवासाची श्रृंखला आंदोलन असेपर्यंत ठेवली जाणार आहे. सोनीपथ येथे कुंडली सीमेवर आज ६५ वर्षीय निरंजन सिंह या शेतकऱ्याने विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.