राजस्थानची अनोखी रामलीला; कुठलाच कलाकार एकही शब्द बोलत नाही, 200 वर्षे जुनी परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2024 06:16 PM2024-10-06T18:16:37+5:302024-10-06T18:17:12+5:30
ही अनोखी रामलीला पाहण्यासाठी देशभरातून प्रेक्षक येतात. जाणून घ्या या अनोख्या रामलीलेबद्दल...
Ramleela : भारतात सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. यानिमित्त अनेक ठिकाणी रामलीलेचे आयोजन केले जाते. भारतात आजपासून नाही, तर अनेक शतकांपासून रामलीला आयोजित केली जात आहे. काही ठिकाणी रामलीला दशमीपर्यंत, तर काही ठिकाणी दिवाळीपर्यंत सुरू असते. रामलीलेत कलाकार श्रीराम, लक्ष्मण आणि रामायणातील विविध पात्रे साकारतात, त्यांच्यासारख्या वेषभुषा करतात आणि संवाद बोलतात.
बहुतांश ठिकाणी रामलीला सारखीच असते. पण आम्ही तुम्हाला एका अशा रामलीलेविषयी सांगणार आहोत, जी इतर ठिकाणांपेक्षा खूपच वेगळी आहे. या रामलीलेत एकही पात्र संवाद बोलत नाही. म्हणजे या रामलीलेत मूक अभिनय केला जातो. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील बिसाऊ येथे होणारी मूक रामलीला खूप लोकप्रिय आहे.
झुंझुनूची मूक रामलीला
राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील बिसाऊ येथे दरवर्षी मूक रामलीला आयोजित केली जाते. या रामलीलेची खास गोष्ट म्हणजे, यात एकही पात्र संवाद बोलत नाही. मूक अभिनयातून आपला संदेश जनतेपर्यंत पोहोचवतात. सुमारे 15 दिवस चालणारी ही मूक रामलीला पाहण्यासाठी संपूर्ण भारतातून लोक येतात. आजपासून नाही तर जवळपास 200 वर्षांपासून येथे मूक रामलीला सुरू असल्याचे सांगितले जाते.
मूक रामलीला कशी सुरू झाली?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे 200 वर्षांपूर्वी झुंझुनू जिल्ह्यातील बिसाऊमध्ये जमना नावाची साध्वी राहत होती. त्यांनी एकदा एका गावात काही मुलांना एकत्र केले आणि त्यांना रामलीला रंगवायला लावली. मात्र, रामलीलाच्या मंचकादरम्यान मुले संवाद बोलू शकले नाहीत. त्यामुळे साध्वीने त्यांना संवाद न बोलता फक्त हावभाव आणि हातवारे करायला सांगितले. यानंतर या परिसरात मूक रामलीला होऊ लागल्याचे सांगितले जाते.