एका लग्नाची अनोखी गोष्ट... नवऱ्याला घटस्फोट देऊन तिनं मैत्रिणीशीच थाटला संसार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 05:22 PM2019-01-01T17:22:41+5:302019-01-01T17:23:56+5:30
दोघींनीही मंदिरात जाऊन सर्वसाधारपणे लग्न केलं आहे.
लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये 2 महिलांनी लग्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष, म्हणजे या महिलांनी लग्नानंतर घटस्फोट देत एकमेकींशी संसार थाटला आहे. या दोन्ही महिलांचे कॉलेजमध्ये असताना एकमेकींवर प्रेम होते. मात्र, कुटुंबीयांच्या विरोधामुळे या दोघींना वेगळे व्हावे लागले होते.
लग्नबंधनात अडकलेल्या या दोन्ही महिलांपैकी एकीचे वय 24 तर दुसरीचे वय 26 वर्षे आहे. दोघींनीही मंदिरात जाऊन सर्वसाधारपणे लग्न केलं आहे. 6 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 मध्ये बदल करून समलैंगिकता हा गुन्हा नसल्याचे स्पष्ट केलं होतं. मात्र, देशात अद्यापही समलैंगिक विवाहासंदर्भात कुठलाही नियम बनविण्यात आला नाही. त्यामुळे रजिस्टारने या दोन मुलींच्या विवाहाची कुठलीही नोंद करून घेतली नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आम्ही दोघी एकत्र राहू शकतो. त्यासाठी आम्हाला कुणीही त्रास देऊ शकत नाही, असे आमच्या वकिलांनी आम्हाला सांगितल्याचे या महिलांनी म्हटले आहे.
दरम्यान, 6 वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये शिकत असताना, या दोघींमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र, कुटुंबीयांच्या विरोधानंतर दोघींचेही लग्न झाले. त्यानंतर, मोठ्या हिमतीने या दोघींनी आपल्या पतीला तलाक देत पुन्हा एकत्र येण्याचं धाडस दाखवलं आहे.