हरयाणात अनोखा विवाह सोहळा : नवरा-नवरी आणि वऱ्हाडीही दृष्टिहीन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 06:01 AM2022-05-13T06:01:45+5:302022-05-13T06:01:59+5:30
फुलांनी सजवलेल्या ई-रिक्षामध्ये वधूला बसवून घेऊन गेला...
- बलवंत तक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंडीगड : हरियाणात एका अनोखा विवाह सोहळा पार पडला असून, त्याची जगभर चर्चा होत आहे. यात नवरा-नवरी तर दृष्टिहीन होतेच. त्याचबरोबर वऱ्हाडीही दृष्टिहीन होते. सप्तपदी घेतल्यानंतर वर वधूला सजवलेल्या ई-रिक्षामधून घेऊन गेला. भिवानी शहराच्या रूपा-चंपा गल्लीतील जीन माता मंदिरात हा सोहळा थाटात झाला.
दृष्टिहीन संदीप व त्याच्याबरोबर सात फेरे घेणारी मीरा या दोघांनीही दृष्टिहीनांच्या शाळेत शिक्षण घेतले. या दोघांच्या जीवनात आनंद आणण्याचे श्रेय दृष्टीबाधित दिव्यांग सशक्तीकरण संस्थेला जाते. संस्थेचे संचालक सी. के. गोसाई यांनी म्हटले आहे की, संदीप व मीरा यांना एकमेकांच्या मदतीने जीवन यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा देत आहे. या आगळ्या वेगळ्या विवाहाची सध्या हरयाणात आणि सोशल मिडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
डीजेवर नृत्य
विशेष म्हणजे या विवाह समारंभात रिबन कापणे, बूट लपविण्यासह इतर विधीही पार पडले. डीजेवर दृष्टिहीनांनी असे काही जोषपूर्ण नृत्य केले की, पाहणारे लोकही उत्साहित झाले. कारप्रमाणे ई-रिक्षाला फुलांच्या हारांनी सजविण्यात आले होते. या वेळी महिलांनी मंगल गीते गायिली व नवदाम्पत्याच्या सुखी संसारासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर वर-वधू नवीन जीवनाची सुरूवात करण्यासाठी आनंदाने आपल्या घरी गेले.