सत्तासंघर्षाचा निकाल आल्यावर एकजूट; विरोधकांचेही महाराष्ट्राकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 12:10 PM2023-04-28T12:10:52+5:302023-04-28T12:11:29+5:30
विरोधी पक्षांकडून एकच उमेदवार येणार
हरीश गुप्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात एकच उमेदवार उभा करण्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करताना सावधपणे पावले टाकत आहेत. त्यांनी सर्वांना स्वीकारार्ह फॉर्म्युला तयार करण्यासाठी यापूर्वी दिल्लीत अरविंद केजरीवाल, कोलकातामध्ये ममता बॅनर्जी व लखनौमध्ये अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत.
जनता दल (यू)च्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, १३ मे रोजीच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर ऐक्याची प्रक्रिया वेग घेऊ शकेल. महाराष्ट्राशी संबंधित सुप्रीम कोर्टाचा फैसलाही १० मेच्या आसपास येण्याची शक्यता आहे. कारण न्या. एम. आर. शाह १४ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत आणि ते या पीठात सहभागी आहेत. काही विरोधी पक्षांनी १९९६ च्या फॉर्म्युल्याचा सल्ला दिला आहे, असे समजते. त्यावेळी काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती व नंतर संयुक्त मोर्चा उभारला होता. एच. डी. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल यांच्या नेतृत्वातील सरकारला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसला तेव्हा राजी करण्यात आले होते. दुसरा फॉर्म्युला २००४ सारखा आहे. त्यावेळी विरोधी पक्षांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली होती व यूपीएने स्थापन केलेले सरकार १० वर्षे चालले होते.
नेमके काय ठरले?
नितीशकुमार बिगर-काँग्रेस, बिगर-भाजप आघाडीच्या विरोधात आहेत व काँग्रेस केंद्रस्थानी असावा, अशी मते त्यांनी सार्वजनिकरीत्या मांडलेली आहेत.
काँग्रेसला चार हात दूर ठेवल्यास अपेक्षित लक्ष्य
साध्य करता येणार नाही.
लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीमध्ये वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर प्रत्येक पक्षाला जागा वाटप करता येईल, असे त्यांना वाटते.
विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, विरोधकांची पुढची बैठक पाटणा येथे घेण्यात यावी. तथापि, पश्चिम बंगालमध्ये त्यांना काँग्रेसशी हातमिळवणी करायची नाही.