जीएसटी दरावर एकमत नाही; पुन्हा होणार बैठक
By admin | Published: October 20, 2016 04:26 AM2016-10-20T04:26:27+5:302016-10-20T04:26:27+5:30
‘जीएसटी’ परिषदेच्या बुधवारी संपलेल्या तीन दिवसांच्या बैठकीत एकमत होऊ न शकल्याने हा दर निश्चित करण्यासाठी परिषदेची बैठक येत्या ३ व ४ नोव्हेंबर रोजी पुन्हा घेण्यात येणार
नवी दिल्ली : नव्याने लागू करण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) दर काय असावा यावर ‘जीएसटी’ परिषदेच्या बुधवारी संपलेल्या तीन दिवसांच्या बैठकीत एकमत होऊ न शकल्याने हा दर निश्चित करण्यासाठी परिषदेची बैठक येत्या ३ व ४ नोव्हेंबर रोजी पुन्हा घेण्यात येणार आहे.
परिषदेचे अध्यक्ष व वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीनंतर सांगितले की, ‘जीएसटी’ दराबाबत केंद्र आणि राज्यांमध्ये अजूनही विचार विनिमय होण्याची गरज आहे. ही नवी कर प्रणाली लागू केल्यावर ज्या राज्यांचे महसुली नुकसान होईल त्यांना भरपाई देण्याची व्यवस्था कशी करावी, यावर मात्र एकमत झाले. मात्र कराचा दर व भरपाईचे सूत्र दोन्ही विषय परस्परावलंबी असल्याने दोन्हींचे निर्णय एकदमच औपचारिकपणे जाहीर होतील. जीएसटी दराचे ६, १२, १८ व २६ टक्के असे चार स्लॅब असावेत. चैनीच्या आणि आरोग्यास हानीकारक वस्तूंवर कमाल दराखेरीज अधिभार लावावा. (लोकमत न्यूज नेटवर्क)