“विरोधकांची एकजूट २०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये चमत्कार घडवणार”: शत्रुघ्न सिन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 05:37 AM2023-06-11T05:37:42+5:302023-06-11T05:38:01+5:30
हिमाचल प्रदेश व कर्नाटक विधानसभा निवडणुकांत या चमत्काराचे दर्शन घडले आहे.
पाटणा : विरोधकांची एकजूट २०२४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये चमत्कार घडविण्याची शक्यता आहे, असे तृणमूल काँग्रेसचे खासदार व अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले.
त्यांनी सांगितले की, २३ जून रोजी पाटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीतून काही चांगले निष्पन्न होईल, अशी मला आशा आहे. विरोधकांची एकजूट घडविण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार करत असलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांची शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रशंसा केली. या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार आहेत.
ते म्हणाले की, ममता बॅनर्जी या गेम चेंजर आहेत. पाटणामध्ये होणाऱ्या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधीदेखील सहभागी होणार आहेत. केंद्रात विरोधकांचे सरकार सत्तेत आणण्यासाठी समान किमान कार्यक्रम तयार करण्याकरिता ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
‘मी ज्योतिषी नाही’
सिन्हा म्हणाले की, मी काही ज्योतिषी नाही. मात्र, येत्या लोकसभा निवडणुकांत चमत्कार घडणार, असा माझा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश व कर्नाटक विधानसभा निवडणुकांत या चमत्काराचे दर्शन घडले आहे.