विरोधकांच्या एकीसाठी सोनिया गांधी मैदानात, राजकारणात अजूनही सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 02:21 AM2018-01-30T02:21:13+5:302018-01-30T02:21:47+5:30
सोनिया गांधी यांनी आपले पुत्र राहुल गांधी यांच्या हाती काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे दिली असली, तरी त्या राजकारणातून अजिबात निवृत्त झालेल्या नाहीत. विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी काँग्रेसतर्फे त्याच प्रयत्न करतील, असे स्पष्टपणे दिसत आहे.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : सोनिया गांधी यांनी आपले पुत्र राहुल गांधी यांच्या हाती काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे दिली असली, तरी त्या राजकारणातून अजिबात निवृत्त झालेल्या नाहीत. विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी काँग्रेसतर्फे त्याच प्रयत्न करतील, असे स्पष्टपणे दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी सोमवारी झालेल्या विरोधी नेत्यांच्या बैठकीत हे स्पष्ट झाले. बैठकीला उपस्थित असलेल्या गुलाम नबी आझाद व आनंद शर्मा या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितले की, सोनिया गांधी याच काँग्रेस संसदीय पक्षाच्या यापुढेही अध्यक्ष राहणार आहेत आणि विरोधी ऐक्यासाठी त्या प्रयत्न करीत राहतील.
विरोधकांची पुढील बैठक १ फेब्रुवारी रोजी होणार असून, बहुधा त्या बैठकीला स्वत: सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत. मात्र,
ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. या आधी आॅगस्ट महिन्यात सोनिया गांधी यांनी विरोधकांची
जी बैठक बोलावली होती, तिला पवार हजर नव्हते.
अनेक जण उपस्थित
आजच्या बैठकीला सोनिया गांधी वा राहुल गांधी यांना बोलावण्यात आले नव्हते. मात्र, पवार व राहुल गांधी यांचे फोनवर बोलणे आधीच झाले होते. शरद यादव, फारुख अब्दुल्ला, राजू शेट्टी, भाकपचे डी. राजा, माकपचे सीताराम येचुरी दिल्लीबाहेर असल्याने, त्यांचे प्रतिनिधी के. टी. रंगराजन तसेच राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे, माजिद मेमन हजर होते. मात्र, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, राजद वा बसपाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते.