पंतप्रधानांच्या घोषणेला वाटाण्याच्या अक्षता
By Admin | Published: March 24, 2015 11:06 PM2015-03-24T23:06:40+5:302015-03-24T23:55:21+5:30
जनधन योजना : विम्याची रक्कम फक्त ३० हजार
जनधन योजना : विम्याची रक्कम फक्त ३० हजार
संकेत शुक्ल
नाशिक : भारतातील तळागाळातील लोकांनी राष्ट्रीयीकृत बॅँकेत खाते उघडावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या जनधन योजनेतील लाभार्थ्यांना असलेल्या विमा कवचाच्या रकमेवरून शासनामध्येच गोंधळ असून, त्या अंतर्गत दिवंगत खातेधारकाच्या वारसाला जनधन नव्हे, तर आम आदमी विमा योजनेंतर्गत रक्कम दिली गेल्याने शासनाने एकप्रकारे पंतप्रधानांच्या घोषणेलाच वाटाण्याच्या अक्षता लावल्याचा आरोप होत आहे.
भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर पहिल्याच स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जनधन योजनेची घोषणा केली होती. या योजनेनुसार राष्ट्रीयीकृत बॅँकेत झिरो बॅलन्सवर खाते उघडणार्या नागरिकांनाही विम्याचे संरक्षण कवच देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले होते. हे कवच सुमारे एक लाखाचे असेल, असेही ते म्हणाले होते. त्यानुसार या योजनेला देशभरात चांगले योगदान मिळाले. सर्वसाधारण गटातील लाखो नागरिकांनी त्याअंतर्गत विविध राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्ये खातेही उघडले.
ऑक्टोबर महिन्यापासून या योजनेला प्रतिसाद मिळत असतानाच अवघ्या काही दिवसांनंतर त्यातील काही खातेधारकांचा मृत्यूही झाला. मोदींनी घोषणा केल्याप्रमाणे खातेधारकांच्या वारसांनी बॅँकेत विमा रकमेसाठी विचारणा केली. विम्याची जबाबदारीही बॅँकेवरच टाकण्यात आली असल्याने बॅँकेने त्यानुसार शासनाच्या अंगिकृत असलेल्या भारतीय आयुर्विमा कंपनीकडे त्याबाबत विचारणा झाल्यानंतर शासनाने जनधन योजनेतील लाभार्थ्यांना जुन्याच आम आदमी विमा योजनेनुसार मदत देण्याचा निर्णय घेतल्याचे कळवण्यात आले. त्यानुसार नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ांतील मयत खातेधारकांच्या वारसांना प्रत्येकी ३० हजार रुपये देण्यात आले.
५० खातेधारकांना लाभ
जनधन योजनेत खाते उघडलेल्या आणि त्यानंतर अल्पावधीतच मृत्यू झालेल्या सुमारे ५० खातेधारकांच्या विमा रकमेबाबत साशंकता निर्माण झाली होती. त्यानुसार शासनाशी संपर्क साधला असता प्रत्येक मृत खातेधारकाच्या वारसाला आम आदमी विमा योजनेप्रमाणे ३० हजार रुपये देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार भारतीय आयुर्विमा कंपनीने सुमारे ५० खातेधारकांच्या वारसांना त्याचा मोबदला दिला आहे. आम आदमी विमा योजनेत नैसर्गिक मृत्यूसाठी ३० हजार रुपये देण्यात येतात, तर अपघाती मृत्यूमध्ये ७५ हजार रुपये दिले जातात. जनधनमध्ये पंतप्रधानांनी एक लाखाची घोषणा केली होती.
शासनाच्या आदेशानुसारच परिपूर्ती
जनधन योजनेतील सभासदाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसाने विमा रकमेबद्दल बॅँकेत विचारणा केली. बॅँकेच्या अधिकार्यांनी त्यानुसार आमच्याकडे क्लेम पाठवले. हे क्लेम कोणत्या पद्धतीने द्यावे याचे मार्गदर्शन घेण्यासाठी जेव्हा आमच्या वरिष्ठ कार्यालयात संपर्क साधला तेव्हा आम आदमीच्या नियमांनुसार क्लेम (परिपूर्ती) देण्याचे आम्हाला सांगण्यात आले. त्यानुसार प्रत्येक सभासदाच्या वारसाला आम्ही ३० हजार रुपये प्रदान केले.
- शेखर मोघे (सरचिटणीस, विमा कामगार युनियन)