हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय देणारच; जेएनयू विद्यार्थी संघाने प्रशासनाचा इशारा धुडकावला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 06:45 AM2020-03-02T06:45:14+5:302020-03-02T06:45:34+5:30
ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी संघाला दिला होता.
नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी संघाला दिला होता. मात्र, या निर्णयावर ठाम असल्याचे सांगत विद्यार्थी संघाने कुलगुरूंचा इशारा धुडकावून लावला आहे.
प्रशासनाच्या धमक्यांवर मानवता मात करील. हिंसाचारग्रस्तांसाठी विद्यापीठ नेहमीच खुले राहील, असे विद्यार्थी संघाने म्हटले आहे. जेएनयूचे कुलसचिव प्रमोद कुमार यांनी शुक्रवारी नोटीस जारी करताना हिंसाचारातील पीडितांना आश्रय देऊ नये, असे म्हटले होते. तसेच, पीडितांना आश्रय दिल्यास शिस्तभंगाची करावाई करण्याचा इशाराही दिला होता.
जेएनयूमध्ये १९८४ मध्येही हिंसाचारातील पीडितांना आश्रय देण्यात आला होता. ते आश्रयस्थान आजही खुले आहे आणि सुरू राहील, असे टष्ट्वीट जेएनयू विद्यार्थी संघाने केले आहे. कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी पीडितांना आश्रय देण्याऐवजी जीवनावश्यक वस्तू भेट देण्याचे आवाहन केले होते.
>आप सरकारवर टीका
जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यास परवानगी दिल्याने विद्यार्थी संघाने आम आदमी पक्षाच्या सरकारवर टीका केली आहे. अल्पकालीन राजकीय लाभासाठी दिल्ली सरकारने केलेले कृत्य दुर्दैवी आहे. कन्हैया कुमारसह दहा जणांवर चालविण्यात येणारा खटला पूर्णपणे चुकीच्या आरोपांवर असल्याचेही विद्यार्थी संघाने म्हटले आहे.