Unlock 4: देशातील जनतेला अनलॉक-४ चे वेध; यादीत फक्त निर्बंध असलेल्या गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 02:45 AM2020-08-26T02:45:14+5:302020-08-26T06:52:23+5:30
दिल्लीमध्ये १ सप्टेंबरपासून मेट्रो सुरू करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे निगमने मेट्रो सेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र मुंबईतील मेट्रो कधी सुरू होईल, हे महाराष्ट्र सरकारच ठरवेल.
नवी दिल्ली : देशातील जनतेला आता अनलॉक-४ चे वेध लागले असून केंद्र सरकार ते जाहीर करताना फक्त निर्बंध असलेल्या गोष्टींची यादीच प्रसिद्ध करणार असल्याचे समजते. यादीत ज्यांचा समावेश नसेल, त्या सुरू होऊ शकतील.
सध्या मेट्रो रेल्वे, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, बार, नाट्यगृहे, सभागृहे बंद आहेत. यापैकी काही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू हाऊ शकतील. सामाजिक, राजकीय सभा तसेच शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावरील बंदी दिवाळीच्या आसपास उठवण्यात येईल, असे समजते.
दिल्लीमध्ये १ सप्टेंबरपासून मेट्रो सुरू करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे निगमने मेट्रो सेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र मुंबईतील मेट्रो कधी सुरू होईल, हे महाराष्ट्र सरकारच ठरवेल.
शाळा, कॉलेजचे काय?
शाळा मात्र सुरू होण्यास बराच वेळ लागू शकेल. काही राज्यांनी उच्च शिक्षणाच्या संस्था, कॉलेज सुरू करण्याची विनंती केली आहे.
त्यामुळे आयआयटी, आयआयएमसह सर्व कॉलेज आणि विद्यापीठे दिवाळीपूर्वी कदाचित सुरू होतील. मात्र शाळा इतक्यात सुरू करू नयेत, अशीच सर्व राज्ये व केंद्र सरकारची भूमिका आहे. महाराष्ट्राने तर महाविद्यालयांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यासही विरोध दर्शविला आहे.